उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गृहविभागाने साेमवारी (दि.७) राज्यातील पाेलिस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, यातील नऊ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश अपर पाेलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी (दि.८) काढले आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षकपदी बदली झालेल्या शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांचाही समावेश आहे. या नऊ अधिकाऱ्यांना पुढील आदेशांपर्यंत जुनाच पदभार सांभाळावा लागणार आहे.

भारतीय पोलिस सेवा व महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. त्यात अधीक्षक आणि उपआयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त शर्मिष्ठा वालावलकर (घार्गे) यांची नाशिकच्या एसीबी अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, मंगळवारी नव्याने आलेल्या आदेशानुसार १०४ अधिकाऱ्यांपैकी नऊ अधिकाऱ्यांना जुनीच जबाबदारी सोपवली असून, उर्वरित अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी पदभार स्वीकारण्याचे आदेश आहेत. त्यानुसार प्रशांत मोहिते, नम्रता पाटील, संदीप डोईफोडे, दीपक देवराज, सुनील लोखंडे, प्रकाश गायकवाड, तिरुपती काकडे, योगेश चव्हाण व शर्मिष्ठा वालावलकर या अधिकाऱ्यांना तूर्तास नवीन ठिकाणी पदभार स्वीकारता येणार नसल्याचे समजते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT