उत्तर महाराष्ट्र

नाशिक : वाहतूक पोलिसांकडून टोइंग कारवाईत अरेरावी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टोइंग कारवाई करताना वाहनचालक-मालक जागेवर आल्यास नो पार्किंगचे तडजोड शुल्क घेऊन वाहन सोडण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. मात्र, वाहतूक पोलिस व टोइंग व्हॅनवरील कर्मचार्‍यांकडून या आदेशाला पायदळी तुडवले जात असल्याचा अनुभव अशोकस्तंभ येथे रविवारी (दि.15) नाशिककरांनी अनुभवला. महिलेने वाहनावर टोइंग कारवाई न करण्याची विनंती केली तरी कर्मचार्‍यांकडून बळजबरीने वाहन व्हॅनमध्ये ठेवले. वाहतूक पोलिसाने तेथे जमलेल्या नागरिकांवर दमदाटी केली व महिलेस कारवाईचा धाक दाखवल्याचे चित्र आढळून आले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 1 ला अशोकस्तंभ येथे टोइंग व्हॅन आली. तेथे व्हॅनमधील कर्मचार्‍यांनी उड्या मारून दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात कारवाई करण्याआधी वाहतूक पोलिसांनी पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे, वाहतूक पोलिसाने व्हॅनच्या खाली उतरणे अपेक्षित आहे. मात्र तसे घडले नाही. त्याच वेळी कर्मचार्‍यांनी दुचाकी उचलण्याचा प्रयत्न केला दुचाकीमालक महिला तेथे आली. तिने कारवाई करू नका, अशी विनंती करीत दुचाकी व्हॅनमध्ये ठेवण्यास विरोध केला.

टोइंग करार करताना वाहनचालक-मालक कारवाई करताना जागेवर आल्यास त्यास नो पार्किंगचे तडजोड शुल्क वसूल करून वाहन सोडण्याच्या सूचना करारनाम्यात आहेत. मात्र, या सूचनेकडे वाहतूक पोलिस व कर्मचारी दुर्लक्ष करीत वाहनांवर सरसकट कारवाई करीत आहेत. रविवारी दुपारीदेखील याच प्रकारे पोलिसांनी महिलेच्या दुचाकीवर कारवाई केली. नागरिकांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता वाहतूक पोलिसाने 'माजला का रे तू' असे बोलून एकास दमदाटी केली. यामुळे टोइंग व्हॅनवरील कर्मचार्‍यांच्या अरेरावीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

करारनाम्यातील नियमांकडे दुर्लक्ष
टोइंग करारनाम्यानुसार नियमांचे पालन होत नाही. तरीदेखील कारवाईस मुदतवाढ देण्यात येत आहे. करारनाम्यातील नियमांच्या पूर्तता टोइंग कर्मचार्‍यांकडून होत नसतानाही त्याकडे पोलिस दुर्लक्ष केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT