अंधारी; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. भगिनाथ कोंडीबा दांगोडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास निदर्शनास आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील सोनारी शिवारात राहणारे शेतकरी भागीनाथ कोंडिबा दांगोडे (वय.४२) रा. अंधारी हे मंगळवारी रात्री पत्नी संगीता मुलगा विशाल दोन मुली अर्चना भारती कुटुंब यांच्यासोबत रात्रीचं जेवण करून झोपलेले पत्नी व मुले झोपी गेल्यानंतर भागीनाथ घरात नसल्याने पत्नी व मुले जागी झाली. त्यांनी आरडाओरड करून लक्ष्मण दांगोडे व महेंद्र यांना बोलाविले सर्वांनी रात्रभर शोधाशोध करून त्यांचा थांगपत्ता लागला नाही. बुधवारी (दि.१७) सकाळी सहाच्या सुमारास पुतण्या महेंद्र घरामागील शेतात गेला. यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला भागीनाथ दांगोडे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
सदरील घटनेची माहिती अंधारी येथील पोलीस पाटील कल्पना दिनेश खराते यांना देण्यात आली. त्यांनी लगेच सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट जमादार बावस्कर व भारती यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी व नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून नापिकी व कर्जाच्या विवंचनेत होते. आमच्या घरातील कर्ता पुरूष गेल्यामुळे आम्ही उघड्यावर पडलो आहोत असा आक्रोश कुटूंबियांकडून पहायला मिळत आहे. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.
हेही वाचा