उत्तर महाराष्ट्र

नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मनपा शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर निवडीबद्दल मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले.

नाशिकच्या स्किल डू मार्शल आर्ट असोसिएशनतर्फे सोलापूरला राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मनपा शाळा क्रमांक 87 (पाथर्डी गाव) येथील सातवीचा विद्यार्थी साहिल रवींद्र वानखेडे आणि मनपा शाळा क्रमांक 86 (पाथर्डी गाव) येथील सहावीची विद्यार्थिनी वैष्णवी रतन उगले यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. या दोन्ही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक आनंद रोकडे, मुख्याध्यापिका कांता दराडे, वर्गशिक्षक अनंत जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इंडियन क्यूब असोसिएशन यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या नॅशनल क्यूब चॅम्पियनशिप स्पर्धेत मनपा शाळा क्रमांक 18 (आनंदवली) येथील सातवीच्या स्नेहल शेवाळेने सुवर्णपदक, तर दिव्या सोनवणेने रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत देशभरातील 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये थ—ी लेअर, टू लेअर आणि पिरॅमिड या तिन्ही प्रकारचे क्यूब काही सेकंदांतच सोडवत मुलींच्या गटात स्नेहलने सुवर्णपदक, तर दिव्याने रौप्यपदक मिळविले. या दोघींना वर्गशिक्षिका कुंदा बच्छाव, मुख्याध्यापक कैलास ठाकरे, जिनिअस किड्स सेंटरचे नितीन जगताप, वैशाली जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

आयुक्तांना आले गहिवरून

आयुक्त यांनी स्नेहल शेवाळेला तिच्या पालकांबाबत विचारले असता, स्नेहलने आई-वडिलांचे निधन झाले असल्याचे सांगितले. स्नेहल लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. कालांतराने आईनेही साथ सोडल्याने ती पोरकी झाली. आनंदवली भागात राहणारी स्नेहल आता मामा राकेश खलानी यांच्याकडे राहून शिकत आहे. तिची आपबिती ऐकून आयुक्त गहिवरले. तुला कुठलीही मदत लागली, तर सांग, असा शब्द आयुक्तांनी स्नेहलला दिला. नाव, पत्त्यासह स्नेहलची सर्व माहिती त्यांनी घेतली. तिला सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना शिक्षक वर्गालाही केल्या. यावेळी स्नेहलने आयुक्तांना क्यूब सोडविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT