उत्तर महाराष्ट्र

नाशिक : हजार मोकाट जनावरे कोंडवाड्यात ; महापालिकेच्या तिजोरीत ‘इतक्या’ लाखांची भर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरासह उपनगरातील मोकाट जनावरांविरोधात महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दीड वर्षात तब्बल 1 हजार 41 मोकाट जनावरांना जेरबंद करून त्यांची रवानगी महापालिकेच्या कोंडवाड्यात करण्यात आली आहे. त्यापैकी अवघ्या 279 पशुपालकांनी दंड भरून जनावरे सोडविली आहेत, तर 760 जनावरे अधिकृत गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. या कारवाईमुळे महापलिकेच्या तिजोरीत 10 लाखांची भर पडली आहे.

शहरातील प्रमुख मार्गांवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा मुक्त संचार बघावयास मिळत आहे. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरी भागातही मोठ्या प्रमाणावर गायी व अन्य भटकी जनावरे त्रासदायक ठरत आहेत. रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसणारी मोकाट, भटकी जनावरे वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने अपघातांना आमंत्रण मिळते. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर मनपा प्रशासनाकडून मोकाट जनावरांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकणे तसेच संबंधित जनावर मालकांकडून दंडात्मक कारवाई मनपाकडून केली जात आहे. या कारवाईसाठी महापालिकेकडून ठेका देण्यात आला आहे. जुलै 2020 ते ऑक्टोबर 2021 या 14 महिन्यांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांतून तब्बल 941 मोकाट व भटकी जनावरे पकडण्यात आली होती. त्यापैकी 244 पशुपालकांनी प्रतिजनावर 2,800 रुपये दंड भरून आपापली जनावरे परत नेली, तर पशुपालक न आल्याने 697 जनावरे महापालिकेने नंदिनी गोशाळेत तसेच अन्य अधिकृत गोशाळेत जमा केली.

महसुलापेक्षा दुप्पट खर्च…

मनपाने गेल्या वर्षी 941 जनावरांसाठी 17.87 लाख रुपये ठेकेदाराला मोजले होते, तर यंदा जानेवारी व फेब—ुवारी 2022 या दोन महिन्यांत पकडलेल्या 100 मोकाट जनावरांपोटी महापालिकेला 1.80 लाखांचा खर्च आला आहे. मोकाट जनावरे पकडण्याच्या दंडात्मक कारवाईतून मिळणार्‍या महसुलापेक्षा खर्च दुप्पट आहे. हा ठेका 'सेवा' वर्गात मोडत असल्याने खर्चापेक्षा मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत आहे.

जुलै 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत 244 पशुपालकांकडून 7 लाख 24 हजार 680 रुपये, तर जानेवारी ते फेब—ुवारी 2022 या दोन महिन्यांत 2.80 लाखांचा दंड वसूल केला आहे. दीड वर्षात तब्बल 10 लाख 4 हजार 680 रुपयांचा दंड या कारवाईतून वसूल करण्यात आला.

जानेवारी 2022 पासून मोकाट जनावरे पकडण्याचा ठेका शरण संस्थेला दिला आहे. जानेवारी व फेब—ुवारी या दोन महिन्यांत 100 मोकाट जनावरे पकडण्यात आली असून, त्यापैकी 35 जनावरे मालकांनी दंड भरून परत नेली आहेत. 63 जनावरे नंदिनी गोशाळेत जमा करण्यात आली. गेल्या दीड वर्षात तब्बल 760 जनावरे गोशाळेत जमा करण्यात आली आहेत.
– डॉ. प्रमोद सोनवणे,
पशुवैद्यकीय अधिकारी

दंडवसूल

(जुलै 20 ते ऑक्टोबर 21) – 7,24,680

(जानेवारी-फेब्रुवारी 2022)-2,00,080 

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT