उत्तर महाराष्ट्र

नाशिक : आमदारांच्या ड्रिम प्रोजेक्टची सुरक्षा वाऱ्यावर

अंजली राऊत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने संरक्षक भिंत काेसळल्यामुळे भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या आणि शहरातील सर्वांत लोकप्रिय अशा प्रमोद महाजन उद्यानाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. तीन आठवडे उलटूनही अद्याप या भिंतीची डागडुजी करण्यात आलेली नसून, या पडक्या भिंतीच्या विटा व माती अक्षरश: मुख्य रस्त्यावर आली आहे. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला असून, अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे. यामुळे मनपाच्या पश्चिम विभागाचा सार्वजनिक बांधकाम आणि उद्यान हे दोन्ही विभाग नक्की करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि लहान मुलांचे सर्वांत आवडते ठिकाण म्हणजे प्रमोद महाजन उद्यान होय. नाशिक मध्यच्या आमदार व त्या प्रभागाच्या तत्कालीन नगरसेविका प्रा. देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून या उद्यानाची निर्मिती झाली आहे. त्या काळातील त्यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून या उद्यानाकडे पाहिले जाते. तितक्याच आपुलकीने त्यांनी हे उद्यान जपले आहे. उद्यानालगत एकही टपरी वा हातगाड्यांचे अतिक्रमण आ. फरांदे यांनी होऊ दिलेले नाही. त्यामुळे लोकप्रिय झालेल्या या उद्यानात सुट्टीच्या दिवशी लहान मुलांसह पालकांची अक्षरशः झुंबड उडालेली असते. शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या उद्यानात येत असतात. या उद्यानाच्या उपयोगितेमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली होती. मात्र, आता मनपाच्या उद्यान विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येते आहे. उद्यानाच्या पश्चिम बाजूच्या संरक्षक भिंतीचा मुख्य भाग कोसळून तीन आठवडे उलटूनही सार्वजनिक बांधकाम व उद्यान विभागाचे याकडे लक्ष गेले नाही, ही आश्चर्याची बाब आहे. उद्यानाच्या वेळा ठरवून देण्यात आलेल्या आहेत. ठराविक वेळेत उद्यानाचे प्रवेशद्वार बंद करून घेतले जाते. असे असताना दुसरीकडे मात्र संरक्षक भिंतच कोसळलेली असल्याने उद्यानातील महागडे साहित्य चोरी जाण्याची शक्यता आहे. तसेच, उद्यानाची उर्वरित संरक्षक भिंतही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनीच आता याकडे लक्ष देण्याची गरज असून, लवकरात लवकर भिंतीची दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT