उत्तर महाराष्ट्र

नाशिक : विहिरीत खाट सोडून गावकऱ्यांनीच बछड्याला काढलं बाहेर

गणेश सोनवणे

देवळा (जि. नाशिक) :  पुढारी वृत्तसेवा

कनकापुर ता. देवळा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढण्यात येऊन जंगलात सोडून देण्यात आले. विहिरीत  पडलेल्या या बछड्याला पाहाण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मोठ्या प्रयत्नांनी विहिरीत खाट सोडून बछड्याला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. वन विभागाला या घटनेची कल्पना दिल्यावरही वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कनकापूर -कांचणे रस्त्यालगत लक्ष्मण आनंदा शिंदे यांची विहीर आहे. नेहमीप्रमाणे शिंदे यांनी विहिरीत डोकावून बघितल्यावर त्यांना बिबट्याचे बछडे पडले असल्याचे दिसून आले. याबाबत आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना समजताच त्यांनी बछड्याला बघण्यासाठी विहीरीजवळ गर्दी केली. वन विभागाला याची कल्पना दिल्यानंतर, विहीर मालक शिंदे यांनी विहिरीत खाट सोडून त्याला बाहेर काढले. एका कॅरेट मध्ये पकडून जवळच असलेल्या जंगलात सोडून देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या परिसराला लागून ऐतिहासिक कांचन किल्ला आहे. या परिसरता बिबट्याची दहशत आहे. पाण्यासाठी त्यांची भटंकती सुरु असते. बछड्याने पाणी पिण्यासाठी विहिरीत उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी याठिकाणी पिंजऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT