अंधत्वावर मात करीत त्याने घडविले जीवन

अंधत्वावर मात करीत त्याने घडविले जीवन
Published on
Updated on

दीपेश सुराणा : 

पिंपरी : अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला! या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती चिंचवड येथील भूषण तोष्णिवाल यांनी वास्तव आयुष्यात सार्थ ठरविल्या आहेत. जन्म झाल्यानंतर विसाव्या दिवसापासून वाट्याला आलेल्या अंधत्वावर मात करून भूषणने स्वतःचे जीवन घडविले. संगीत अलंकार ही पदवी घेऊन भूषणने गायन क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.
त्याचप्रमाणे, सी.ए. व अन्य पाच पदव्युत्तर पदव्या घेऊन शिक्षण क्षेत्रातही आपली अनोखी छाप सोडली आहे. सध्या तो एका खासगी विमा कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत आहे.

यश हे तुम्ही जे मिळविले आहे, त्यावरुन मोजले जात नाही. तर तुम्हाला ज्या विरोधाचा सामना करावा लागला आणि ज्या धैर्याने तुम्ही प्रचंड संकटांना तोंड देत संघर्ष केला, त्यावरुन मोजले जाते. जन्म झाल्यानंतर विसाव्या दिवशी भूषणची दृष्टी गेली. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती, कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि उपलब्ध साधनांचा सर्वोत्तम वापर करण्याची क्षमता भूषणच्या ठायी असल्याने त्याने एकीकडे गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविलाच. त्याच बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रातही पाच पदव्युत्तर पदव्या, सी.ए.चे शिक्षणदेखील पूर्ण केले. त्याने सीएची परीक्षा 2011 ला दिली. तर, 2014 मध्ये त्याचा निकाल लागून त्याने सी.ए. होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सी.ए.चा अभ्यास करताना त्याला आई वाचून दाखवायची. अंतिम वर्षाला इंटरनेटवर स्क्रीन रीडरच्या मदतीने तो अभ्यास करीत असे. लेखनिकाची मदत घेऊन त्याने ही परीक्षा दिली.

सहायक व्यवस्थापक पदापर्यंत वाटचाल
शिक्षण पूर्ण केल्यानंतर भूषणला सुरुवातीला मुलाखतीसाठी बोलावले जात नव्हते. बोलावले तरी त्याची निवड होत नव्हती. त्याला पहिली नोकरी 2012 मध्ये एका खासगी कंपनीत मिळाली. त्याने 2014 पर्यंत काम केले. सध्या एका खासगी विमा कंपनीत तो सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. कंपनीत रुजू झाला तेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज पाहत होता.

विदेशातही केले गायन
भूषणने संगीत अलंकारमध्ये देशभरात प्रथम स्थान मिळविले. हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्ती आणि सुगम संगीत अशा सर्व गायन प्रकारात तो वाकबगार आहे. प्रसिद्ध गायक अनुप जलोटा, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, डॉ. विकास कशाळकर, उस्ताद रशीद खान, जयलक्ष्मी कृष्णमूर्ती आणि संगीत सम्राट चित्रविणा रविकिरण या गुरुंचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्याने देशभरात गायनाचे कार्यक्रम केले आहेत. त्याचप्रमाणे, कॅनडा, अमेरिकासह विविध देशांमध्ये त्याने गायन सादर केले आहे. त्याला 1996 मध्ये स्वरभूषण पुरस्कार मिळाला. 2018 मध्ये नॅशनल रोल मॉडेल पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे, युवा प्रेरणा, युवा गौरव, राष्ट्र गौरव असे विविध पुरस्कार त्याला मिळाले आहेत. पुणे आकाशवाणी येथे वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची संधी मिळाली. ताक धिना धिन.., सारेगामापा अशा रिअ‍ॅलिटी शो मध्ये देखील त्याने सहभाग घेतलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news