उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अग्निशमन दलाचेही मंगळवारपासून ढोल बजाव…

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम न मिळाल्याने दिवाळीत आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळावा, यासाठी अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांतर्फे मंगळवारी (दि. 1) दुपारी 3 ते 5.30 या वेळेत महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

थकीत कर वसुलीसाठी मनपा प्रशासनाने थकबाकीदारांच्या घराबाहेर ढोल वाजवून कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. त्यामुळे वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळण्यासाठी कर्मचार्‍यांकडूनही ढोल बजाव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून फरकाची रक्कम मिळेल, अशी आशा कर्मचार्‍यांना आहे. महापालिकेतील इतर विभागांतील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात आली आहे. अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांनी, फरकाची रक्कम मिळावी, यासाठी काळ्या फिती लावून मुख्य वित्त व लेखाधिकारी यांचा निषेध नोंदवित दिवाळी साजरी केली. तरीदेखील फरकाची रक्कम मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT