मोशी : थेट पीएमपी नसल्याने प्रवाशांचे हाल | पुढारी

मोशी : थेट पीएमपी नसल्याने प्रवाशांचे हाल

मोशी; पुढारी वृत्तसेवा: पीएमपी प्रशासनाकडून नवीन बस मार्ग सुरू करताना कानडोळा केला जात आहे. त्यामुळे मोशी आणि चाकण परिसरातून पुण्यात जाण्यासाठी प्रवाशांना दोन गाड्या बदलून तिकिटाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवाशांना आर्थिक फटका प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद अंगीकारून गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील लगतच्या जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरातील गावांच्या रोजच्या दळणवळणाचा पीएमपी अविभाज्य भाग बनली आहे. परंतु, अनेक ठिकाणी थेट बससेवा सुरू करण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
पीएमपी प्रशासनाने पुणे ते राजगुरूनगरपर्यंत धावणारी एकमेव बससेवा बंद केली आहे. त्या जागी दोन टप्प्यांत दोन बससेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दोन बस बदलत जावे लागत आहे. पीएमपीने मोशी ते पुणे स्टेशन, येरवडा मार्ग पुन्हा सुरू केला होता. मात्र, अनेक प्रवाशांची वाकडेवाडीमार्गे चाकण ते पुणे स्टेशन किंवा मोशी ते पुणे स्टेशन अशी बससेवा सुरू करण्याची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष करून काही दिवसांतच प्रशासनाने मोशी ते पुणे स्टेशन (येरवडा मार्ग) बंद केला.

पुणे-नाशिक महामार्ग परिसरातील नागरिकांची नाराजी
पिंपरी चिंचवड मनपाकडून पीएमपी बस संचलनासाठी नागरिकांच्या करातूनच पैसे दिले जातात. परंतु, प्रवाशांना सेवा देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुण्यात जाण्यासाठी थेट बससेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोशी आणि परिसरातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, नोकरदार, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना थेट बस उपलब्ध नसल्याने प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. वेळ आणि पैसा व्यर्थ जात आहेत. त्यामुळे मोशी, चाकण परिसरातून पुणे स्टेशन, मनपा व पिंपरी चिंचवड शहरात थेट बससेवा सुरू करावी.

                                      – संतोष बोराटे, स्थानिक नागरिक

Back to top button