नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मान्सूनने जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी केली असून, अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आहे. सततच्या पावसाने नदी-नाले दुथडी वाहत असून, धरणेही काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 127.2 टक्के पर्जन्य झाले आहे. गेल्या 32 वर्षांतील पावसाच्या सरासरीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात सहाव्यांदा 127 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात जूनमध्ये पावसाने काहीसा आखडता हात घेतला होता. मात्र, जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांच्या काळात त्याने सारी कसर भरून काढली आहे. चालू महिन्याच्या 18 तारखेपर्यंत संततधार कायम होती. तूर्तास पावसाने उघडीप दिली असली, तरी त्याने वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 933.8 मिमी आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत 1,187.4 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या 127.2 टक्के इतके हे प्रमाण आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस पडला. जुलै व ऑगस्ट या महिन्यांत नांदगाव, मालेगाव, दिंडोरीसह अन्य काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यामुळे शेतीपिकांना सर्वाधिक फटका बसला असून, मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.
मान्सूनचा दरवर्षीचा प्रवास बघता, जून ते सप्टेंबर या काळात अधूनमधून 10 ते 15 दिवस मान्सूनमध्ये खंड पडत असतो. या काळात पाऊस विश्रांती घेत असल्याने शेतीपिकांना त्याचा फायदा मिळतो. यंदाच्या वर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात सलग संततधार सुरू होती. चालू महिन्यातही पावसाने हा पायंडा कायम राखल्याने इगतपुरी वगळता 14 ही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीशी तुलना केल्यास वार्षिक पर्जन्यमानाच्या 127 टक्क्यांहून अधिक पाऊस पडला. दरम्यान, 5 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या मान्सूनचा अंदाज असल्याने सरासरीत वाढ होऊ शकतेे.
2015 साल ठरले दुष्काळी : जिल्ह्यात 2006 मध्ये वार्षिक सरासरीच्या 169.5 टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर 2009 ते 2012 या काळात सलग चार वर्षे मान्सून सरासरी गाठू शकला नव्हता. दरम्यान, 2015 ला सरासरीच्या केवळ 61 टक्के पाऊस जिल्ह्यात पडला होता. त्यामुळे गेल्या 32 वर्षांत 2015 साल सर्वात दुष्काळी ठरले.
127 टक्क्यांहून अधिक पावसाचे वर्ष : 1990 पासून जिल्ह्यातील पावसाच्या आकड्यांवर नजर टाकल्यास सहावेळेस सरासरीच्या 127 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये 1994 (138.3 मिमी), 2005 (144.2 मिमी), 2006 (169.5 मिमी), 2017 (127 मिमी), 2019 (157.18) तर यांदाच्या वर्षी आतापर्यंत 127.2 मिमी पावसाची नोंद झाली.
धरणांमध्ये 99 टक्के पाणीसाठा : सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 24 प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 65 हजार 226 दलघफूवर म्हणजेच 99 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्ट एण्डिंगलाच धरणांमध्ये 95 टक्क्यांहून अधिक साठा निर्माण झाला असून, गेल्या 28 वर्षांतील हा उच्चांक ठरला. जिल्ह्यामधून 1 जूनपासून ते आजपर्यंत मराठवाड्यातील जायकवाडीत 101 टीएमसीहून अधिक पाणी पोहोचले आहे.
वर्ष टक्केवारी वर्ष टक्केवारी वर्ष टक्केवारी
1990 118.8 2001 88.0 2012 77.73
1991 101.6 2002 93.4 2013 104.46
1992 95.7 2003 95.1 2014 84.79
1993 112.1 2004 125 2015 61.0
1994 138.3 2005 144.2 2016 102.79
1995 82.9 2006 169.5 2017 127.0
1996 101.8 2007 122.4 2018 83.3
1197 104.1 2008 111.2 2019 157.18
1198 114.6 2009 69.4 2020 100.00
1999 107.6 2010 89.5 2021 84.3
2000 75.0 2011 84.2 2022 127.2
आतापर्यंत