पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या आहेत. पक्षाध्यक्षपदाबरोबर मुख्यमंत्रीपदही आपल्याकडेच राहावे, यासाठी गेहलोत आग्रही आहेत. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर बुधवारी ( दि. २८ ) होणारी भेट टाळली, असे मानले जात आहे. बुधवारी रात्री उशीरा गेहलोत दिल्लीत दाखल झाले. आज ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार ३० सप्टेंबर अखेरचा दिवस आहे. त्यामुळे राजस्थान मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आजच घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी रात्री अशोक गेहलोत दिल्लीत दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, " काँग्रेस पक्षाची एक परंपरा आहे. पक्षामध्ये अध्यक्षपद सर्वोच्च आहे. इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीपासून आम्ही पाहत आहोत. पक्षात एक शिस्त आहे. आम्ही काँग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार कम करतो. येणार्या काळाचा विचार करुन निर्णय घ्यावे लागेल".
आम्ही अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार आहोत. आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर चर्चा केलेली नाही. ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे राजस्थानमधील मंत्री प्रतापसिंह कचारियावास यांनी सांगितले. अशोक गेहलोत राजस्थान मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्वास मंत्री विश्वेंद्र सिेंह यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राजस्थान मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे राजस्थानच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधी यांनी मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते की, 'एक व्यक्ती एक पद'च राहिल. त्यामुळे राजस्थानचे ख्यमंत्री किंवा काँग्रेसचे अध्यक्षपद यापैकी एकाच पदावर गेहलोत यांना राहावे लागणार आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिल्यास त्यांना राजस्थान मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे मानले जात आहे.
रविवारी गेहलोत समर्थक ९० हून अधिक आमदारांनी सामूहिक राजीनामा देणार असल्याची धमकी दिली होती. त्यामुळे आता गेहलोत कोणता निर्णय घेणार याकडे पक्षाचे लक्ष लागले आहे. गेहलोत समर्थक आमदारांनी थेट गांधी कुटुंबाविरोधात भूमिका घेतली आहे. तसेच अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष झाले तरी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी तेच कायम राहावेत, अशी अट त्यांच्या समर्थकांनी घातली आहे.
अशोक गेहलोत अजूनही पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहेत, असे सूत्रांनी सांगितले. तसेच राजस्थान काँग्रेसमधील गेहलोत समर्थक आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि अंबिका सोनी यांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली आहे. राजस्थान काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यात आल्याचा दावाही नेत्यांकडून केला जात आहे. दुसरीकडे सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक असून, काँग्रेस नेते आता त्यांची कशी समजूत काढणार यावरही राजस्थान काँग्रेसमधील पुढील घडामोडी ठरणार आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार ३० सप्टेंबर अखेरचा दिवस आहे. शशी थरुर शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दिग्विजय सिंह यांनीही आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच काँग्रेस अध्यक्षपदाबाबत कोणाला संधी द्यावी याबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील, असे मानले जात आहे.
हेही वाचा :