उत्तर महाराष्ट्र

नाशिक : टीईटीचा टक्का घसरला, 3.70 टक्के उमेदवार पात्र

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनानंतर अर्थात 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी (दि. 23) रात्री उशिरा जाहीर झाला. निकालाची टक्केवारी घसरली असून, अवघे 3.70 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या सुमारे 4 लाख 68 हजार 679 उमेदवारांपैकी अवघे 17 हजार 322 उमेदवार पात्र ठरले आहेत. तब्बल 96 टक्क्यांहून अधिक उमेदवार अपात्र ठरले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 2019 व 2020 मध्ये टीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 21 नोव्हेंबर 2021 ला टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच 2018 मध्ये झालेल्या 'टीईटी' परीक्षेतील घोटाळा राज्यभर गाजला होता. ऑगस्ट महिन्यात परिषदेने बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळविणार्‍या राज्यभरातील 7 हजार 800 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल रखडला होता. तेव्हापासून उमदेवारांना निकालाची प्रतीक्षा होती. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे 2021 च्या टीईटी निकालाची घोषणा केली. त्यानुसार पहिली ते पाचवीसाठीचा पेपर एक दिलेल्या 2 लाख 54 हजार 427 उमेदवारांपैकी 9 हजार 674 उमेदवार पात्र झाले. या गटाच्या पात्रतेची टक्केवारी 3.80 आहे, तर सहावी ते आठवीसाठी 64 हजार 647 उमेदवारांनी गणित, विज्ञानाचा पेपर दोन दिला होता. त्यातील 937 उमेदवार पात्र झाले असून, त्यांची टक्केवारी अवघी 1.45 इतकी आहे. तसेच सहावी ते आठवीच्या सामाजिक शास्त्राचा पेपर दोन हा 1 लाख 49 हजार 604 उमेदवारांनी दिला होता. त्यातील 6 हजार 711 उमेदवार पात्र ठरले. दरम्यान, पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांमार्फत प्रमाणपत्र पाठविण्यात येईल, असे दराडे यांनी स्पष्ट केले.

पेपरनिहाय टक्केवारी
पेपर                                                                टक्केवारी
पेपर 1 (पहिली ते पाचवी)                                    3.80
पेपर 2 (गणित-विज्ञान, सहावी ते आठवी)               1.45
पेपर 2 (सा. शास्त्र, सहावी ते आठवी)                    4.49
एकूण                                                              3.70

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT