उत्तर महाराष्ट्र

Nashik Surgana : उंबरपाडा पि येथील नळपाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन पुरात गेली वाहून

गणेश सोनवणे

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत उंबरपाडा पि येथील भारत निर्माण योजनेची पाईप लाईन पुरात वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री उंबरठाण परिमंडळात एकाच रात्री दोनशे दहा मि. मी. पाऊस झाला.  विज व ढगांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा पाऊस झाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे खुंटविहीर पैकी मोहपाडा येथील वनविभागाने बांधलेला मातीचा बंधारा फुटल्याने उंबरपाडा पि येथील रस्त्यावर भले मोठे भगदाड पडले. याठिकाणी वाहन धारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत तर दुसरीकडे जोरदार आलेल्या पुरात उन्मळून पडलेली झाडे, वाळलेले ओंडके, लाकडे पुरात वाहून आल्याने सुमारे वीस फुट उंचीवरून पाईपलाईनचे लोखंडी पाईप तुटून पडले. यामुळे उंबरपाडा पि येथील नागरिकांना येत्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय याची चिंता सतावत आहे.

या पाड्यावर जल जीवन मिशन योजनेंतर्गत "हर घर जल' योजनेची पाईप मंजूर असून केवळ पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या करीता जुनीच पाईप लाईन वापरण्यात येणार होती. मात्र तीच पुरात वाहून गेल्याने पाणी पुरवठा विभागाला नव्याने अंदाज पत्रक तयार करून सादर करावे लागणार आहे. दोन हजार सहा, सात साली भारत निर्माण योजनेची पाईप लाईन झाली होती. त्यावेळी ग्रामपंचायत गोंदुणे पैकी पिंपळसोंड येथील नळपाणी पुरवठा योजनेची प्रभावी पणे अमंलबजावणी करण्यात आली होती. तिचा वापर सुरु होता. मात्र अतिदुर्गम भागातील थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत नसल्याने योजना बंद स्थित होती. ग्रामपंचायत गोंदुणे यांना तात्काळ लक्ष देऊन दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भारत निर्माण योजनेची नळपाणी पुरवठा योजना ही जुनी झाली होती. अनेक ठिकाणी पाईप तुटले होते. ग्रामपंचायत लक्ष देत नसून वेळोवेळी दुरुस्ती केली जात नव्हती त्यामुळे काही ठिकाणी जास्तच खराब झाली होती. आमच्या उंबरपाडा येथे स्वतंत्र पणे जल जीवन योजनेची विहीर मंजूर करून हर घर जल योजना राबविण्यात यावी. उंबरपाडा पि ते पिंपळसोंड हे अंतर चार ते पाच किलोमीटर दूर  असल्याने रात्री अपरात्री मोटार पंप सुरु करण्यासाठी कोणीही जात नाही. या अडचणी लक्षात घेता स्वतंत्रपणे योजना राबविण्यात यावी.
शिवराम चौधरी.
माजी सैनिक पिंपळसोंड सुरगाणा

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT