गरूडाची दृष्टी असते ‘इतकी’ तीक्ष्ण | पुढारी

गरूडाची दृष्टी असते ‘इतकी’ तीक्ष्ण

नवी दिल्ली : गरूडाला ‘पक्ष्यांचा राजा’ असे म्हटले जाते. गरूडामध्ये अनेक गुण असतात ज्यामुळे त्याला ‘पक्ष्यांचा राजा’ हे बिरूद मिळाले. त्याच्या विविध गुणांमध्ये त्याच्या तीक्ष्ण द़ृष्टीचाही समावेश आहे. माणसापेक्षा त्यांची द़ृष्टी आठपट अधिक तीक्ष्ण असते. आकाशातून उडत असतानाही ते जमिनीवरील आपल्या भक्ष्याला पाहून त्यावर अचूक हल्ला करू शकतात. गरूड दोन ते पाच किलोमीटर अंतरावरील ससा किंवा अन्य तत्सम प्राणी पाहून त्यावर झडप घालू शकतात. गरूडाची द़ृष्टी सर्वात तीक्ष्ण असते.

गरूडांमध्ये वेगाने एखाद्या ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणावर द़ृष्टी केंद्रीत करण्याची क्षमता असते. याचा अर्थ ते वेगाने आपला ‘फोकस’ बदलू शकतात. तसेच त्यांच्यामध्ये माणसापेक्षाही अधिक रंग पाहण्याची क्षमता असते. त्यामुळे आपल्या भक्ष्याच्या रंगसंगतीमधील थोडासा बदलही ते ओळखू शकतात. तसेच ते अतिनील प्रकाशही पाहू शकतात हे विशेष. दिवसाच्या वेळी तीक्ष्ण द़ृष्टी असणार्‍या पक्ष्यांमध्ये गरूड, ससाणे, घार यांचा समावेश होतो. मात्र, त्यांची ही क्षमता दिवसाच्या उजेडातच असते.

गरूडाचे पंख पातळ आणि वक्र असतात, त्यामुळे ते अतिशय वेगाने उडू शकतात आणि हे पंख त्यांना दिशा बदलण्यास मदत करतात. त्यांचे पंजे अत्यंत मजबूत असतात जे त्यांना शिकार करण्यास मदत करतात. गरूड हा एक अद्भूत पक्षी आहे जो आकाशात 12000 फुटांपर्यंत उडू शकतो. तो ताशी 320 किलोमीटर वेगाने आकाशात उडू शकतो. विशेष म्हणजे गरूड जमिनीवरही वेगाने धावू शकतो.

Back to top button