नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वादग्रस्त महापालिका प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतल्याची माहिती समोर येत असून, अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, दोन्ही लाचखोरांवर सरकारवाडा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सुनीता सुभाष धनगर (५७, रा. रचित सनशाइन, उंटवाडी, नाशिक) व नितीन अनिल जोशी (४५, रा. पुष्पांकुर, चव्हाणनगर, तपोवन, नाशिक) अशी दाेघा लाचखाेरांची नावे आहेत. धनगर या वर्ग दाेनच्या अधिकारी, तर जाेशी हा वर्ग तीनचा कर्मचारी आहे. ५० वर्षीय तक्रारदार हा मुख्याध्यापक असून, ताे एका खासगी शैक्षणिक संस्थेत कार्यरत हाेता. त्याचदरम्यान संस्थेने त्यांना बडतर्फ केले आहे. कारवाईच्या विराेधात त्यांनी नाशिकच्या शैक्षणिक न्यायाधीकरणात दाद मागितली हाेती. त्यामुळे न्यायाधीकरणाने बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती दिली. तरीदेखील संस्थेने या मुख्याध्यापकास सेवेत दाखल करून घेतले नाही. त्यानंतर त्यांनी मनपाच्या शिक्षणाधिकारी धनगर यांच्याकडे संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी धनगर यांनी संस्थेला पत्र काढण्याकामी तक्रारदार मुख्याध्यापकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागून कार्यालयातच स्वीकारली. दरम्यान, लिपिक जाेशी याने हे पत्र बनवण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेतली. एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार, वैशाली पाटील यांच्या सूचनेने पोलिस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव आणि हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी सापळा यशस्वी केला. दाेघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर दाेघांच्या घरांची झडती घेतली जात असून, त्यातूनही मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लाचखोर रडारवर
जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या लाचखोरीचे अनेक कारनामे समोर येत असतानाच महापालिकेच्या शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याने नाशिककरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध मोहीम उघडली असून, नागरिकांनी बिनदिक्कतपणे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :