पुणे; पुढारी वृत्तसेवा : शाळेत विद्यार्थ्यांनी केलेले ढोल-ताशावादन… त्यावर थिरकणारे विद्यार्थी… सोशल मीडियावर झालेला शुभेच्छांचा वर्षाव… घरी पेढे वाटून साजरा केलेला आनंदोत्सव… शाळांमध्ये रंगलेला कौतुक सोहळा आणि घरीच रंगलेली पार्टी… अशा उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी (दि. 2) दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाचे यश साजरे केले.
निकाल कळताच प्रत्येकाचा आनंद द्विगुणित झाला आणि त्यांनी पेढे वाटून कुटुंबीयांसोबत, मित्र-मैत्रिणींबरोबर आनंद सेलिब्रेट केला. शाळांमध्ये झालेल्या कौतुक सोहळ्यामध्येही विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले, तर सायंकाळी मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत भविष्याची स्वप्ने रंगवली.
लॅपटॉप, मोबाईल आणि टॅबवर ऑनलाइन दहावीचा निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. दहावीच्या निकालाचा आनंद शाळांमध्येही पाहायला मिळाला. दुपारनंतर विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्यात आले आणि त्यांचा कौतुक सोहळा रंगला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तर शाळांमध्ये ढोल-ताशाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी नृत्य करण्याचा आनंद लुटला. हेच चित्र डीईएस सेकंडरी स्कूलमध्येही पाहायला मिळाले, तर दुसरीकडे पालकांनीही मुलांच्या यशाचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला.
काहींनी सायंकाळी मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांच्यासोबत यशाचा जल्लोष साजरा केला. उत्तीर्ण झाल्यानिमित्त पालकांनी मुलांना भेटवस्तूही दिल्या. जे उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांनी पुढील वर्षी नव्या उमेदीने परीक्षा देण्याचा निर्धार केला. निकालाचा आनंद कष्टकरी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मनसोक्तपणे साजरा केला. एकूणच, दहावीच्या निकालाचा आनंदोत्सव आणि जल्लोष सगळीकडे पाहायला मिळाला.