उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका प्रशासनाने आर्थिक कारण तसेच इतर मुद्द्यांच्या आधारे आधी रद्द केलेला गोदावरी नदीवरील 15 कोटींचा पूल उभारण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनीच शिफारस केली आहे. यामुळे या शिफारशीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात असून, रद्द केलेल्या पुलाला पुन्हा चालना कशी द्यायची, असा प्रश्न मनपासमोर उभा राहिला आहे.

मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नाशिकप्रश्नी झालेल्या बैठकीत खा. गोडसे यांनी पुलांविषयी लक्ष वेधत नगरविकास विभागाने मनपाकडून अहवाल मागविला आहे. या पुलाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. तसेच हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यावेळी तत्कालीन नगरविकासमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपाकडून अहवाल मागविला असता तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित पूल रद्दची शिफारस शासनाकडे केली होती. यामुळे आता पुलाबाबत पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ नगरविकास आणि महापालिकेवर येणार आहे. गंगापूर रोडवरील जेहान सर्कलपासून नरसिंहनगरमार्गे आभाळे मळा, शिंदे मळा या दरम्यान 30 मीटर डीपी रोडवर 20.85 कोटी रुपये, तर गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशन ते मखमलाबाद या दरम्यान 14.98 कोटी रुपये खर्चून या पुलांच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव मंजुरीवरून वाद निर्माण झाला होता. गोदावरी नदीवर आनंदवली पूल, शहीद चित्ते पूल, फॉरेस्ट नर्सरी पूल, चोपडा लॉन्स, रामवाडी तसेच अहिल्यादेवी होळकर पूल असे अनेक पूल आहेत. त्यात आता आणखी नवीन पूल उभारल्यास भविष्यात गोदावरीच्या पुराला अडथळे निर्माण होऊन पाण्याचा फुगवटा वाढून नागरी वस्त्यांना हानी पोहोचू शकते, अशी भीती आहे. तसेच सीडब्ल्यूआरएच्या अहवालानुसार गोदावरीवर नवीन पूल बांधणे धोकेदायक असल्याचे अहवालात म्हटलेले आहे. मात्र, या पुलाशी संबंधित ठेकेदाराने तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने दबाव टाकल्यामुळे मनपा प्रशासन आणि आमदार देवयानी फरांदे बॅकफूटवर गेले होते. पंपिंग स्टेशन येथील स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर नगरविकास खात्याकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यावर तत्कालीन आयुक्त पवार यांनी संबंधित पुलाची गरज नसल्याचा अभिप्राय दिला होता. डीपी रोडवरील मंजूर पुलाजवळच 100 मीटर अतंरावर शहीद चित्ते पूल आहे. त्यामुळे या ठिकाणी पुलाची गरज नाही, असे असताना नवीन पूल बांधला गेला आहे. आता या पुलापासून 500 मीटर अंतरावरच जुने पंपिंग स्टेशनजवळ पूल बांधला गेल्यास प्रभाग क्र. 7 मधील चैतन्यनगर, अयाचितनगर, चव्हाण कॉलनी, सहदेवनगर, परीचा बाग या भागातील पूररेषा प्रभावित होण्याची भीती आहे. त्यामुळे पूररेषेत वाढ झाल्यास स्थानिकांना त्याचा सामना करावा लागू शकतो.

संबंधित स्थानिक नागरिकांना कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने पूल योग्य असल्यास त्याचा विचार करायला हरकत नाही. परंतु, विरोध असेल तर शासन आणि मनपा प्रशासन योग्य तो निर्णय घेईल. – हेमंत गोडसे, खासदार, नाशिक.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT