FIFA WC 2022 : इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा गाठली बाद फेरी; अमेरिकेचा आठ वर्षांनंतर अंतिम १६ मध्ये प्रवेश | पुढारी

FIFA WC 2022 : इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा गाठली बाद फेरी; अमेरिकेचा आठ वर्षांनंतर अंतिम १६ मध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी इंग्लंडने वेल्सला ३-० ने पराभूत केले. मार्कस रशफोर्ड आणि फिल फोडेन यांनी केलेल्या गोलने विजय खेचून आणला. १९६६ चा चॅम्पियन इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा बाद फेरी गाठली आहे. इंग्लंड आणि वेल्सला पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही. पण उत्तरार्धात इंग्लंडने दोन मिनिटांत दोन गोल करत सामन्याचे चित्रच पालटले.

रशफोर्ड याने 50 व्या मिनिटाला फ्री किकवर केलेल्या गोलने १-० अशी आघाडी झाली. त्यानंतर बॉक्समध्ये हैरी केनच्या पासवर फोडेन याने मारलेल्या दमदार शॉटने २-० अशी आघाडी मिळवून दिली. दोन गोलने पिछाडीवर पडललेल्या वेल्सचा बचाव फळी ढासळू लागली. याचा फायदा घेत रॅशफोर्ड याने ६८ व्या मिनिटांला आपल्या नावावर दुसऱ्या तर संघाच्या तिसऱ्या गोलची कमाई केली.

केल्विन फिलिप्सने दिलेल्या पासवर मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूने संधीचे सोने केले. विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील इंग्लंडचा हा 100 वा गोल होता. 56 व्या मिनिटांला डेन जेम्सने वेल्ससाठी गोल करण्याचा प्रयत्न केला. किफर मूरनेही अयशस्वी प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये वेल्सने कडवी झुंज दिली पण दुसऱ्या हाफमध्ये गेरेथ बेलच्या बदलीनंतर वेल्स कमकुवत झाला तर इंग्लंड मात्र अधिक आक्रमक बनला.

संबंधित बातम्या

वेल्सने चार गोलांच्या फरकाने मात केली असती तर इंग्लंडचा संघ अंतिम-16 च्या शर्यतीतून बाहेर गेला असता. पण इंग्लंडने वेल्सची एकतर्फी धुलाई केली. 1958 नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणारी वेल्स बाहेर पडला. इंग्लंड आणि वेल्स यांच्यातील हा सातवा सामना होता, त्यात इंग्लंडने सहावा सामना जिंकला. एक सामना अनिर्णित राहिला.

अमेरिकेचा आठ वर्षांनंतर अंतिम १६ मध्ये प्रवेश

फिफा वर्ल्ड कपमध्ये स्टार मिडफिल्डर क्रिस्टियन पुलिसिकने 38 व्या मिनिटांला केलेल्या गोलमुळे अमेरिकेने मंगळवारी ब गटात इराणचा 1-0 च्या फरकाने पराभव केला. या विजयाने अमेरिकेने फिफा विश्वचषकाच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. संघाने आठ वर्षांनंतर बाद फेरी गाठली आहे. यापूर्वी संघाने २०१४ मध्ये बाद फेरी गाठली होती. पूर्वार्धात अमेरिकेच्या खेळाडूंनी अधिक आक्रमक खेळ केला. पुलिसिकने संघाला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली.

Back to top button