सांगली : कारची काच फोडून चार लाखांची रोकड लांबविली | पुढारी

सांगली : कारची काच फोडून चार लाखांची रोकड लांबविली

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील विकास चौकातील अमोल अशोक चौगुले (वय 38) यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी चार लाखांची रोकड लंपास केली. शंभरफुटी रस्त्यावर बालाजी कदम बिल्डिंगसमोर मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल चौगुले यांचा संगणक विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या शिरोळ शाखेत खाते आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता ते व्यवसायासाठी पैसे लागणार असल्याने कारने शिरोळला गेले होते. त्यांच्यासोबत कारचा चालक अरुण संगाप्पा हडपद हा होता. चौगुले यांनी बँकेतून चार लाखांची रोकड काढली. ही रोकड त्यांनी कारमधील डॅश बोर्डच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती. तेथून ते सांगलीला येण्यास निघाले.

उदगाव, अंकली, इनाम धामणीमार्गे ते विश्रामबाग येथील शंभरफुटी रस्त्यावर आले. बालाजी कदम या बिल्डिंगसमोर त्यांनी चालकास कार थांबविण्यास सांगितले. याच बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर आरसी नावाचे सलून दुकान आहे. तिथे ते चालकास घेऊन दाढी करण्यास गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून डॅश बोर्डमधील चार लाखांची रोकड लंपास केली. चौगुले हे साडेतीन वाजता दाढी करून कारजवळ आले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.विश्रामबाग पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासणी केली; मात्र, संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही. चौगुले यांचा शिरोळमध्ये बँकेतून पैसे काढल्यापासून चोरट्यांनी पाठलाग केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांचे एक पथक तपास करण्यासाठी बुधवारी शिरोळला रवाना होणार आहे.

Back to top button