नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सप्तशृंगी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. सहस्रचंडी महायाग, भगवतीच्या महापूजेबरोबरच पंचांग कर्म पूजन, देवता स्थापन, अग्निस्थापन, नवग्रह हवन पूजन, सहस्रार्चन या पूजाविधीचे आयोजन सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टतर्फे करण्यात आलेले आहे.
मंदिरात चार महिन्यांपूर्वी झालेल्या भगवती मूर्ती संवर्धन कालावधीत दुर्गा सप्तशती पाठ, देवी अथर्वशीर्ष मंत्र आयोजित करण्यात आले होते. आता शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त पंचदिनात्मक, सहस्रचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 2) सुरू झालेला शाकंभरी नवरात्रोत्सव 6 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या पाच दिवसांत पंचदिनात्मक सहस्रचंडी महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य सत्रामध्ये महायज्ञ व होमहवन, धार्मिक विधी होणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रतिमा प्राणप्रतिष्ठा, पूजन स्थापन, सूर्यादी, नवग्रह, विश्व कल्याणासाठी पंचदिनात्मक सहस्रचंडी महायाग होत आहे. 6 जानेवारीला पौर्णिमेच्या दिवशी उत्सवाची प्रात: पूजन यथाशक्ती पूजन, उत्तरांग पूजा, होम, नवाहुती, बलिदान व महायज्ञ, पूर्णाहुती व भाविकांना महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम ट्रस्टच्या भोजनालयात आयोजित केलेला आहे.
ट्रस्टतर्फे भाविकांना आवाहन
जास्तीत जास्त भाविकांनी शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पंचदिनात्मक सहस्रचंडी महायाग सोहळ्यात सहभागी होऊन उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी केले आहे.