उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शैलाने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं, फौजदार पदाला घातली गवसणी

गणेश सोनवणे

मालेगाव  (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  

भाकरीचा चंद्र पाहण्यासाठी स्वयंपाकी झालेले वडील आणि त्यांना मोलमजुरी करून साथ देणाऱ्या आईच्या कष्टांचे चीज शैला पाथरेने केले. बालपणी तीन किलोमीटर पायपीट करून शाळा गाठणारी शैला केवळ अधिकारीच झाली नाही, तर सायने गावातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक ठरली आहे.

तिचे वडील बापू पाथरे हे साधारण अडीच दशकांपासून काबाडकष्ट करत आहेत. ते चाळीसगाव फाटा येथील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात, तर पत्नी कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी मोलमजुरी करते. दारिद्र्य, कष्टाची पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबाला शैलासारख्या गुणी कन्येचे वरदान लाभले. शिक्षणाची प्रारंभीपासूनच ओढ असलेल्या शैलाने रोज तीन किमी पायपीट करून शिक्षण घेतले. मामाचे गाव असलेल्या येसगाव बुद्रुकला चौथीपर्यंत शिकली. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुन्हा सायने येथील सरस्वती विद्यालयात झाले. दहावीला ८३ टक्के गुण मिळवत तिने आपल्या हुशारीची चुणूक दाखवली.

मालेगावच्या आरवीएच कन्या विद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मसगा महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदवी संपादन केली. पुणे विद्यापीठात एमए केले. वसतिगृहात राहात असतानाच स्पर्धा परीक्षांचा मार्ग स्वीकारला. अभ्यासपूर्ण वातावरण आणि तशीच बैठक जमल्याने तिने पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न उरी बाळगले. आर्थिक परिस्थिती नसल्याने कोणताही क्लास लावता आला नसला, तरी स्वयंअध्ययनावर भर दिला. चार वर्षांच्या परिश्रमाचे चीज झाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष हा आदर्श होता. ग्रामीण भागाचा न्यूनगंड न बाळगता, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत प्रामाणिक अभ्यास करायला हवा. कुटुंबीयांनी दिलेल्या प्रोत्साहनाने मिळालेले हे यश आहे. अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याची संधी साधेल.

शैला पाथरे, पोलिस उपनिरीक्षक,

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT