नगरमधील मिरजगाव परिसरात अतिवृष्टी | पुढारी

नगरमधील मिरजगाव परिसरात अतिवृष्टी

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : परिसरात बुधवारी सायंकाळी व रात्री अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. तर, मिरजगाव येथील आठवडे बाजारातील लहान मोठ्या व्यापार्‍यांची मोठी धावपळ झाली. मिरजगाव परिसरात मोठ्या प्रमाणात आर्द्रा बरसल्या, या पावसामुळे शेतकरी समाधान व्यक्त केले जात आहे. खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांनी मशागत करून ठेवली होती. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला होता; मात्र अद्यापपयर्र्ंत मिरजगाव परिसरात पाऊस पडला नव्हता. वरूनराजा कधी येईल याची शेतकरी चिंतात होता. बुधवारी सायंकाळी व रात्री मिरजगावसह मांदळी, कोकणगाव, थेरगाव, रवळगाव आदी परिसरात अतिवृष्टी झाली 89 मिमि पावसाची नोंद झाली आहे.

पाऊस एवढा जोराचा होता की, पाऊसाबरोबर पाणी वाहू लागले. ओढे नाले वाहते झाले, शेतात पाणी साचले, सुदैवाने कोठेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मान्सूनचे आगमन झाल्यापासून अवघा 7 मिमि पाऊस या भागात झाला होता. यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. काही शेतकर्‍यांनी 335 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या. अद्याप 23 हजार 282 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणे बाकी आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे उर्वरित क्षेत्रावर पेरण्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तालुका कृषी कार्यालयातर्फे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. आर्द्रा नक्षत्रात झालेला पाऊस मिरजगाव परिसरातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार आहे. शेतकर्‍यांनी काही समस्या असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन मंडल कृषी अधिकारी अमर आडसूळ यांनी केलेे.

कपाशी, सोयाबीन, बाजरीची पेरणी
एका वेळी 89 मिमि पाऊस झाला; मात्र आज सकल भागात कोठेही पाणी साठलेले दिसले नाही. कृषी सेवा केंद्र चालकांनी बि बियाणांचा मोठा साठा करून ठेवला होता. तेही पावसाची वाट पहात होते. आता, वापसा होताच मका, कपाशी, तूर, सोयाबीन, बाजरी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे.

Back to top button