संगमनेरमधील रस्त्यांसाठीचा निधी आमदार थोरातांमुळेच : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे | पुढारी

संगमनेरमधील रस्त्यांसाठीचा निधी आमदार थोरातांमुळेच : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील 12 महत्त्वाच्या रस्त्यांकरीता 69 कोटी 59 लाख रुपयांचा निधी 8 मार्च 23 रोजी मंजूर झाला आहे. याबाबतच्या बातम्या मार्चमध्येच प्रसारित झाल्या होत्या. मात्र आता या कामाचे थेट तीन महिने उशिरा पत्रकबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाचे मंत्री करत असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी केली आहे.

याबाबत बोलताना कानवडे म्हणाले, राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार हे फक्त जाहिरात बाजी करणारे सरकार आहे. काम न करता प्रसिद्धी करणे किंवा न केलेल्या कामाचे श्रेय घेणे हे या सरकारचे काम आहे. तालुक्यातील 12 महत्वाच्या रस्त्यांसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून 8 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांकरीता निधी मंजूर करून घेतला होता. या कामाच्या मागणीचे व पाठपुराव्याचे पत्रही प्रसिद्धीस देण्यात आले होते. मात्र अपूर्ण माहितीतून फक्त प्रसिद्धी करता टेंडर खुले झाल्याच्या काळात ही बातमी पुन्हा बनून प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी भाजपाकडून केला आहे.

मात्र वस्तुस्थिती जनतेला माहिती आहे. पाठपुरावा कोणी केला. निधी कोणी मिळवला हे सुद्धा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना माहित आहे.
आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत रणखांबवाडी फाटा ते रणखांबवाडी -कुंभारवाडी -वरवंडी रस्तासाठी 11 कोटी 25 लाख रुपये, पिंपरने ते कोळवाडे -शिरापूर या 5 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये, राजापूर ते राष्ट्रीय महामार्ग 50 चिखली या 5 किमी रस्त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये, तळेगाव दिघे ते तालुका हद्द साहेब या 4 किमी रस्त्यासाठी 3 कोटी रुपये.

तर उत्तरेकडील अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या अशापीर बाबा -चिंचोली गुरव- नान्नज दुमाला- सोनोशी- बिरेवाडी मालदाड 19.17 किलोमीटर रस्त्यासाठी 14 कोटी 75 लाख रुपये, संगमनेर नगरपालिका तिरंगा चौक ते मालदाड या 6 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी 37 लाख रुपये ,राष्ट्रीय महामार्ग 60 ते गुंजाळवाडी -राजापूर निमगाव भोजापूर चिकणी या 11 किलोमीटर रस्त्यासाठी 9 कोटी 17 लाख रुपये, रणखांबवाडी- दरेवाडी- कवठेमालकापूर या 6.18 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी 37 लाख रुपये राष्ट्रीय महामार्ग 50 कोल्हेवाडी ते जोर्वे यांच्या 4 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 11 लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ते चिखली या 3 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 73 लाख रुपये असे एकूण 69.59 लाख रुपये मार्चमध्ये मंजूर झाले आहे.

राहाता तालुक्यात अनेक रस्त्यांची कामे बाकी
निधी मार्चमध्ये मंजूर झाला असून या कामाचे टेंडर खुले होणार आहे. मात्र प्रसिद्धीसाठी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राहता तालुक्यात अनेक रस्त्यांची कामे बाकी आहेत. किंबहुना मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगर- मनमाड रस्त्याची अवस्था ही तशीच आहे. सत्ताधारी मंत्र्यांनी त्या कामांकडे लक्ष देणे ऐवजी संगमनेरमध्ये न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये, असे आवाहनही कानवडे यांनी केले आहे.

Back to top button