नाशिक : सत्यशोधक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना महाराष्ट्रातील नामवंत वक्ते अ‍ॅड. संभाजीराव मोहिते. समवेत मान्यवर. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शाहू महाराजांनी रयतेचे राज्य सत्यात उतरवले : मविप्र सत्यशोधक व्याख्यानमाला

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य, कृषी, सिंचन, सहकार, उद्योग अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रांत दूरगामी धोरणे राबविली. त्याची फळे आज आपण चाखत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य महान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत वक्ते अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी केले.

मविप्र संस्था व यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या 150 व्या वर्षानिमित्त रावसाहेब थोरात सभागृहामध्ये आयोजित सत्यशोधक व्याख्यानमालेत 'लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज : राजा आणि माणूस' या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, कृष्णाजी भगत, सेवक संचालक डॉ. संजय शिंदे, सी. डी. शिंदे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिक्षणाधिकारी डॉ. अशोक पिंगळे, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. अजित मोरे, डॉ. भास्कर ढोके, डॉ. विलास देशमुख आदी उपस्थित होते. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे दारिद्य्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करून अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. या संस्थानात प्राथमिक शिक्षणावर होणारा खर्च मोठा होता. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात सर्व जाती-जमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. तसेच नाशिक, पुणे, नगर, नागपूर इ. ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाल्याचेही अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्लंडमधील उच्च शिक्षणास अर्थसाहाय्य केले. शाहू महाराजांनी अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी संघर्ष केला. कुटुंबात होणार्‍या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती, उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत गुणवत्तेचा ब्रॅण्ड निर्माण केल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT