उत्तर महाराष्ट्र

Nashik : ‘स्ट्रीट क्राइम’मध्ये टवाळखोरांचा उच्छाद

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात शेकडो टवाळखोरांवर कारवाई करीत त्यांना दणका दिला होता. मात्र, आठवडाभरातच टवाळखोरांनी कारवाईचा धाक नसल्याचे दाखवत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर एकमेकांना मारहाण करीत, हुल्लडबाजी करीत अप्रत्यक्षरीत्या पोलिसांनाच आव्हान दिले आहे. यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.

पंचवटीतील शिवकृपानगर रिक्षा स्टँडजवळ मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलांच्या दोन गटांत हाणामारी झाली. या दोन्ही गटांनी दगड, हत्याराचा वापर करून एकमेकांना दुखापत केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही म्हसरूळ लिंक रोडवर कुरापत काढून चौघांनी मिळून तिघा युवकांवर रविवारी (दि.२५) सकाळी सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक हल्ला करीत गोंधळ घातला होता. यासारख्या घटनांनी शहरातील शांतता धोक्यात आली आहे. टवाळखोरांसह गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही 'स्ट्रीट क्राइम' कमी हाेत नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याचा धोका आहे. टवाळखोर, गुन्हेगारांवर ठोस कारवाई होत नसल्याने कायद्याचा धाक नसल्यागत युवक गुन्हे करीत आहेत. त्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत असल्याने व त्यांच्यावरही गुन्हे दाखल होत असल्याने त्यांचे शैक्षणिक व नोकरी संदर्भातील अडचणींमध्ये वाढ होत आहे. तरीदेखील अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तव समोर येत आहे. पोलिसांकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांपेक्षा नवीन युवकांचा समावेश जास्त असल्याने पोलिसांनी कारवाईची धार वाढवली असली तरी टवाळखाेरांवर त्याचा धाक नसल्याचे चित्र आहे.

टवाळखोरांकडून होणारा त्रास

– शैक्षणिक संस्थांभोवती घोळक्याने जमा होऊन मुलींची छेड काढणे किंवा पाठलाग करणे

– अंधारात, मोकळ्या भूखंडात किंवा मद्यविक्रीच्या दुकानांबाहेरच मद्यसेवन करून गोंधळ घालणे

– किरकोळ कारणांवरून एकमेकांना किंवा इतर नागरिकांना शिवीगाळ, मारहाण करणे

– पोलिसांच्या गस्तीची वेळ होताच लपून बसणे व पोलिस गेल्यानंतर पुन्हा गोळा होणे

– चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत बसून मोठमोठ्याने बोलणे, गोंधळ घालणे

– सायंकाळच्या वेळी शहरातील बाजारपेठा, धार्मिकस्थळांभोवती कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सरचा आवाज करीत वाहने चालवणे

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT