श्री जवळेश्वराची रथयात्रा आजपासून; गुरूपौर्णिमेपर्यंत पाच दिवस उत्सव | पुढारी

श्री जवळेश्वराची रथयात्रा आजपासून; गुरूपौर्णिमेपर्यंत पाच दिवस उत्सव

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शंभर वर्षांची परंपरा असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील श्री जवळेश्वराच्या रथयात्रा उत्सवाला आज (दि.29) प्रारंभ होत असून, तो गुरूपौर्णिमेपर्यंत (दि.3 जुलै) पाच दिवस चालणार आहे. या यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक येतात. आषाढी एकादशी ते गुरूपौर्णिमा असे पाच दिवस जवळा येथे साजरा होणार्‍या यात्रा उत्सवास वेगळे महत्व प्राप्त आहे. जवळेश्वराच्या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे नर्तिकांचे नाचगाण्याचे कार्यक्रम.

गावातील दहा ते अकरा मंडळाच्या ठिकाणी नर्तिकांच्या नाचगाण्याचे कार्यक्रम रात्रीच्या वेळी होतात. या काळात जवळेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी जवळेश्वराची आरती करून मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापणा केली जाते. आरतीचा मान पाटील व कुलकर्णी यांना आहे.

तसेच, राज्यातील सर्वात मोठा व खूप वर्षापूर्वीचा रथ एकोणीसशे शतकाच्या सुरुवातीला तयार करण्यात आला आहे. जवळा येथील सुतार येदु पंढरीनाथ सुरवसे यांनी हा रथ संपूर्ण रथ सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. आजही हा रथ सुस्थितीत आहे. 2022 च्या रथयात्रेवेळी रथाची चाके जीर्ण झाल्याने बदलण्यात आली. या रथाला स्टेअरिंग नसल्याने हा रथ वळविण्यासाठी समोर व मागे मोठा दोर बांधला जातो. हा दोर यात्रेदिवशी रथाला बांधण्याचा मान मते घराण्याला आहे. रथ यात्रेची ही प्रथा अंदाजे शंभर वर्षांपूर्वीपासून असावी, असे जुने लोक सांगतात.

जवळा गावात जवळेश्वर, बाळेश्वर, काळेश्वर, बेलेश्वर, नंदकेश्वर, असे पाच लिंग असून,यापैकी एक जवळेश्वरचे हेमांडपंथी मंदिर, बाळेश्वर आणि काळेश्वर हे गावातच असून, बेलेश्वर गावाच्या शिवारात आहे. तर, नंदकेश्वर हे लिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेत आहे. जवळेश्वर मंदिराच्या मुख्य गाभार्‍याच्या डाव्या बाजूला गणपती व उजव्या बाजूला भैरवनाथाचे छोटे मंदिर आहे.

पाच ऋषींची पांडर म्हणून प्रसिद्ध

जवळा गाव पाच ऋषींची पांडर म्हणून प्रसिद्ध आहे. जवळेश्वर, बाळेश्वर, काळेश्वर, बेलेश्वर, नंदकेश्वर, असे पाच ऋषी असून, सर्व पाचही स्वयंभू लिंगे प्रभू रामचंद्राच्या काळातील आहेत. प्रभू रामचंद्राचे जामखेड जवळील सौताडा येथे वास्तव्य होते. त्याचवेळी ही पाच लिंगे त्यांनी येथे निर्माण केल्याची आख्यायिका आहे.

हेही वाचा

पुणे : कोयत्याने हल्ला करणार्‍याला 4 दिवस पोलिस कोठडी

पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले

पुण्यात हवेत आणखी तीन हजार सीसीटीव्ही ; सध्या अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध

Back to top button