उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहरात रिक्षा प्रवास महागणार ; किमान भाडे आता ‘इतके’

गणेश सोनवणे

 नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्य वर्ग महागाईच्या खाईत लोटला जात असताना पेट्रोल दरवाढीचा फटका आता प्रवाशांनाही बसणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार दि.१ ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच दीड किलोमीटरला आता २७ रुपये व त्यापुढील किलोमीटरसाठी १८ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत भाडेमीटरमध्ये बदल करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे .

नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणा-या ऑटोरिक्षांचे दर हे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नाशिकमार्फत निश्चित केले जातात. प्राधिकरणामार्फत ऑटोरिक्षाचे सध्याचे दर दि. ९ जानेवारी २०१५ रोजी लागू करण्यात आले होते. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोल इंधनाच्या दरात वाढ झालेली असून, पेट्रोल इंधनाचे दर प्रतिलिटर रुपये ८०.१७ (दि. ०९.०१.२०१५ ) वरून रुपये १०६.७२ झालेले आहे. खटूआ समितीच्या शिफारशींच्या आधारे, सध्याचा महागाई निर्देशांक व वाढलेले इंधनाचे दर इतर संबंधित बाबी विचारात घेऊन त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा चालक- मालक व त्यातून प्रवास करणा-या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देऊन प्राधिकरणाने बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारीत केलेला आहे.

या ठरावानुसार दि. १ ऑक्टोबर २०२२ पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा परवानाधारकांनी भाडेमीटरचे बदल दि. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत करून घेणे आवश्यक आहे. भाडेमीटरचे रि-कॅलिब्रेशन (बदल) होईपर्यंत सुधारित अधिकृत टेरिफ कार्ड दि. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंतच अनुज्ञेय राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT