पुणे शहरात 5 लाख नागरिक बूस्टर डोसबाबत उदासीन | पुढारी

पुणे शहरात 5 लाख नागरिक बूस्टर डोसबाबत उदासीन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना आटोक्यात आल्याने लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये निष्काळजीपणा आला आहे. शहरात 75 दिवस मोफत बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध करून दिल्यावरही अद्याप 5 लाख नागरिक बूस्टर डोसबाबत उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 75 दिवसांमध्ये केवळ 1 लाख नागरिकांनी मोफत बूस्टर डोसचा लाभ घेतला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलै ते 30 सप्टेंबर या 75 दिवसांच्या कालावधीत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 18 वर्षांपुढील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरा डोस घेऊन 6 महिने किंवा 26 आठवडे झालेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर मोफत बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर बूस्टर डोस घेणार्‍या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या शहरात 5 लाख 12 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेणे बाकी आहे, तर 5 लाख 72 हजार 361 जणांचा बूस्टर डोस बाकी आहे. यामध्ये 3 लाख 74 हजार 714 जणांनी कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस, तर 1 लाख 97 हजार 647 जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. बूस्टर डोससाठी कॉर्बेव्हॅक्स घेण्यासही शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

महापालिकेकडे लसींचे पुरेसे डोस उपलब्ध असून, सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. नागरिकांनी स्वत:चे आणि मुलांचे प्राधान्याने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

                              – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

लसीकरण आकडेवारी 18 ते 45 वर्षे वयोगट
पहिला डोस – 24,03,393
दुसरा डोस – 19,51,799
बूस्टर डोस – 1,82,398

45 ते 60 वर्षे वयोगट
पहिला डोस – 6,54,012
दुसरा डोस – 5,90,204
बूस्टर डोस – 93,115

ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस – 4,93,638
दुसरा डोस – 4,51,405
बूस्टर डोस – 1,80,911

Back to top button