अंतराळ स्थानकावरून परतले तीन रशियन अंतराळवीर | पुढारी

अंतराळ स्थानकावरून परतले तीन रशियन अंतराळवीर

मॉस्को : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून तीन रशियन अंतराळवीर सहा महिन्यांनंतर गुरुवारी सुखरूपपणे पृथ्वीवर परत आले आहेत. ‘द सोयूझ एमएस-21’ नावाच्या अंतराळ यानातून आलेग आर्तेमयेव, डेनिस मातवेयेव आणि सर्गेई कोर्साकोव हे तिघे स्थानकातील मोहीम पार पाडून परतले. कझाकिस्तानातील झेजकाजगन शहरापासून 150 किलोमीटर अंतरावरील स्टेपीज या गवताच्या मैदानात ते उतरले. हे तिघेजण मार्चमध्ये अंतराळ स्थानकावर गेले होते.

आर्तेमयेव याचा हा तिसरा अंतराळ प्रवास होता आणि त्याने आतापर्यंत अंतराळात एकूण 561 दिवस व्यतित केले आहेत. मातवेयेव आणि कोर्साकोव यांच्यासाठी ही पहिलीच अंतराळ मोहीम होती. या दोघांनी अंतराळ स्थानकावर 195 दिवस घालवले. ज्यावेळी सोयूझ कॅप्सूल निरभ्र आकाशातून एका मोठ्या लाल-सफेद पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरत होते त्यावेळी आर्तेमयेव यांनी मोहिमेशी निगडीत नियंत्रण कक्षाला सांगितले की सर्व सदस्यांना अतिशय चांगले वाटत आहे.

काही वेळातच त्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सहयोगी दल तिथे पोहोचले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मॉस्कोजवळील स्टार सिटी कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये नेण्यात येईल. अंतराळ स्थानकाचे संचालन सध्या युरोपियन स्पेस एजन्सीची अंतराळवीर समंथा क्रिस्टोफोरेट्टी, अमेरिकेच्या ‘नासा’चा बॉब हाइन्स, केजेल लिंडग्रेन, फ्रँक रुबियो आणि जेसिका वाटकिन्स तसेच रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’चे सर्गेई प्रोकोपयेव व दमित्री पेतेलिन हे अंतराळवीर करीत आहेत.

Back to top button