उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महसूलमंत्र्यांच्या मध्यस्थीने महसूलचा संप अखेर स्थगित

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नायब तहसीलदारांच्या सेवा विभागीय स्तरावरच ठेवण्यासह रिक्तपदे आणि पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर महसूल कर्मचार्‍यांनी बुधवारी (दि.13) रात्री उशिरा त्यांचा संप स्थगित केला. त्यामुळे सोमवार (दि.18) पासून जिल्हाधिकारी कार्यालये गजबजणार आहेत.
शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने दि. 4 एप्रिलपासून संप पुकारला होता. नायब तहसीलदारांच्या सेवा राज्य स्तरावर न ठेवता, विभागीय स्तरावर ठेवाव्यात, नायब तहसीलदारांची पदोन्नती महसूल विभागातील रिक्तपदे तातडीने भरण्यासह इतर 12 मागण्यांचा यात समावेश होता. तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बुधवारी (दि. 13) चर्चेसाठी बोलाविले होते. प्रलंबित मागण्यांबाबत त्यांनी यावेळी सकारात्मकता दर्शविली.

नायब तहसीलदारांच्या सेवा विभागीय स्तरावर ठेवताना अन्य मागण्यांबाबतही इतिवृत्तामधून आश्वासित करण्यात आले. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी संप स्थगित करण्यात येत असल्याची घोेषणा केली. दोन वर्षांतील कोरोना संकटामुळे कर्मचार्‍यांनी संयमाची भूमिका घेतली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने कर्मचारी संघटनांनी 4 तारखेपासून संप पुकारला होता. लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी भूमिकादेखील घेतली होती. त्यामुळे गेल्या नऊ दिवसांपासून नाशिकसह राज्यातील महसूलचे कामकाज ठप्प झाले होते. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला.

शासनाकडून मिळालेला निर्णय तसेच इतिवृत्त पाहता, बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मक विचार झालेला दिसून येत आहे. राज्यातील संघटनेच्या बहुतेक सर्व पदाधिकार्‍यांशी आणि जिल्हाध्यक्ष यांच्याशी बोलून आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.
– हेमंत साळवी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT