स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक नाशिकमध्ये दाखल ; पहिल्याच दिवशी ‘या’ प्रकल्पाची केली पाहणी | पुढारी

स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक नाशिकमध्ये दाखल ; पहिल्याच दिवशी 'या' प्रकल्पाची केली पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षणाकरिता केंद्राचे पथक गुरुवारी
(दि.14) नाशिकमध्ये दाखल झाले असून, पथकाने पहिल्याच दिवशी मनपाच्या खतप्रकल्पाची पाहणी करीत घनकचरा विल्हेवाट प्रक्रियेची माहिती घेतली. शहर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पथकामार्फत प्रभागनिहाय दौरे सुरू करण्यात आले आहेत. मनपामार्फत देण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या सुविधांबाबत नागरिकांची भेट घेऊन ‘सिटिझन फीडबॅक’ जाणून घेतला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन केले जाते. केंद्रीय पथकांमार्फत सहभागी शहरांचे सर्वेक्षण करून देशभरातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली जाते. कोरोनामुळे यावर्षी सर्वेक्षणाला उशीर झाला आहे. 2019 मध्ये 10 लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील 500 शहरांमध्ये नाशिक शहराचा 67 वा क्रमांक लागला होता.

नाशिकचा देशातील पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये समावेश होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जोरदार तयारी केली गेल्याने 2020 मध्ये नाशिकने 67 व्या क्रमांकावरून थेट 11 व्या क्रमांकावर झेप घेतली होती. परंतु, 2021 मध्ये मनपाची क्रमवारी घसरून नाशिक 17 व्या क्रमांकावर घसरले. आता 2022 करिता होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक देशात पहिल्या 10 क्रमांकांमध्ये येण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

कचरा विलगीकरणाची घेतली माहिती
खतप्रकल्प पाहणीनंतर पथकाने शहरातील स्वच्छता आणि मनपामार्फत पुरविण्यात येणार्‍या सेवांबाबत पडताळणीसाठी प्रभागनिहाय दौरे सुरू केले आहेत. गुरुवारी पथकाने प्रभाग क्र. 31 मध्ये भेटी देत निवासी व व्यावसायिक क्षेत्रातील कचरा विलगीकरणाची माहिती घेतली.

Back to top button