उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘आरटीई’साठी शाळांची आजपासून नोंदणी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीई कायद्यांतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून खासगी शाळांच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा नोंदणीला सोमवारी (दि. २३) प्रारंभ होणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत शैक्षणिक संस्थांना 'आरटीई'साठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना अर्ज करता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश दिला जात आहे. मात्र, आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी शाळांची नोंदणी आवश्यक असते. आरटीई प्रवेशाच्या एनआयसीतर्फे ऑटो फॉरवर्ड केलेल्या शाळांची बीईओ स्तरावर पडताळणी केली जाते. त्यानंतर शाळांची निश्चिती होत असते. जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची राहणार आहे. दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीही प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची प्रत बंधकारक आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. त्यावेळी पत्त्यावर मूल किंवा पालक राहात नसल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यासह इतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संचालनालयाने दिला आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे असे…
जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीची प्रत, उत्पन्नाचा पुरावा (सॅलरी स्लिप, तहसीलदाराचा दाखला, कंपनीचा दाखला), दिव्यांग मुलांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT