दूध उत्पादक शेतकर्‍यांना मुरघास ठरतोय वरदान; मुरघास तयार करण्याकडे शेतकर्‍यांचा कल

दूध उत्पादक शेतकर्‍यांना मुरघास ठरतोय वरदान; मुरघास तयार करण्याकडे शेतकर्‍यांचा कल
Published on
Updated on

राजेंद्र कवडे देशमुख

बावडा : दूध उत्पादक शेतकर्‍यांना जनावरांच्या चार्‍यासाठी मुरघास हा वर्षभर उपलब्ध होत असल्याने वरदान ठरत असल्याने चांगले चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. परिणामी, मुरघास तयार करण्याकडे दूध उत्पादक शेतकर्‍यांचा कल गेल्या दोन-तीन वर्षांपासून वाढला आहे. चाराटंचाईवर मुरघास हा अतिशय प्रभावी उपाय असल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांना त्याचा मोठा आधार प्राप्त झाला आहे. शेतातील उभ्या मका तसेच बहुवर्षीय यशवंत गवत (नेपीअर-9) या पिकापासून मुरघास तयार करण्यात येत आहे.

मुरघास तयार करण्यासाठी अल्प खर्च येत असून, ट्रॅक्टर यंत्राद्वारे मकवान अथवा यशवंत गवताची बारीक कुट्टी करून बाजारातून मिळणार्‍या मुरघास बॅगमध्ये हवाबंद करून साठवणूक केली जात आहे. मुरघास हा सुमारे 40 ते 45 दिवसांनंतर जनावरांना खाण्यास तयार होतो. हवाबंद करून ठेवलेला मुरघास कितीही दिवस चांगल्या अवस्थेत राहतो, अशी माहिती दूध उत्पादक शेतकरी महेंद्र सदानंद कोरटकर (वकीलवस्ती) यांनी दिली.

महेंद्र कोरटकर यांनी शनिवारी (दि. 21) शेतातील 15 गुंठे क्षेत्रावरील यशवंत गवताचा मुरघास तयार केला. दरम्यान, यापूर्वी जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होत नव्हता. मात्र, मुरघास तयार केल्याने हिरव्या चार्‍याची टंचाई दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, मुरघास वापरल्याने दूध उत्पादनातही वाढ होत असल्याची माहितीही दीपक कोरटकर यांनी दिली.

इंदापूर तालुक्यात मका पीक वर्षभर तिन्ही हंगामांत मुबलक प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी हे मका पिकापासून मुरघास तयार करीत असल्याने दूध धंदावाढीला मुरघासमुळे चालना मिळाल्याचे शेतकरी अंकुश घाडगे (बावडा), शरद जगदाळे-पाटील (टणू), विलास ताटे-देशमुख (निरा नरसिंगपूर) यांनी सांगितले. सध्या जागोजागी गोठ्याशेजारी मुरघास तयार केलेल्या बॅगा दिसून येत आहेत. मुरघास तयार केल्यास मका पिकातील पौष्टिक घटक कमी होत नाहीत, उलट जनावरे मुरघास आवडीने खात असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news