नगर : आमदार नीलेश लंके किंवा राणीताईंनी खासदार व्हावे ; कार्यकर्त्यांचा शिबिरात सूर | पुढारी

नगर : आमदार नीलेश लंके किंवा राणीताईंनी खासदार व्हावे ; कार्यकर्त्यांचा शिबिरात सूर

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार लंके दांपत्यांपैकी एकाला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या चर्चा सुरू आहेत. शनिवारी देहू येथे नीलेश लंके प्रतिष्ठानच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आमदार नीलेश लंके किंवा राणीताई यापैकी एकाने लोकसभा निवडणूक लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांचा होता. इतकेच नाही, तर सर्वांनी सुरात सूर मिसळत 2024 चा नारा देत खासदारकीचे रणशिंग फुंकले.

मेळाव्याला ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव लंके, नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारे, सल्लागार राजेंद्र चौधरी, सचिव अ‍ॅड. राहुल झावरे, कारभारी पोटघन, दीपक लंके, पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष अशोक सावंत, राळेगणचे माजी सरपंच जयसिंग मापारी, संजय लाकुडझोडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, गंगाराम बेलकर, खंडू भूकन, तालुका अध्यक्ष बापू शिर्के, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, भूषण शेलार, सुभाष शिंदे, नितीन अडसूळ, सचिन औटी युवक तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे, महिला तालुका अध्यक्ष सुवर्णा धाडगे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा उमा बोरूडे, राष्ट्रवादी सरचिटणीस वैजयंता मते, सुवर्णा डोळ, मुंबई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश धुरपते, उपाध्यक्ष गोविंद साबळे, सचिव नितीन चिकणे, खजिनदार दिलीप कोरडे, उपाध्यक्ष कैलास पावडे, विजय डोळ, सदाशिव शेळके, कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले, ठकाराम लंके, वसंत कवाद, सचिन पठारे, नगरसेवक श्रीकांत चौरे, अर्जुन भालेकर, सतीश भालेकर आदी उपस्थित होते. देहू येथे शनिवारी झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत आपण उतरण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

कार्यकर्त्यांनी इच्छा बोलून दाखवली

पारनेर व्यतिरिक्त इतर तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही हीच इच्छा बोलून दाखवली. नगर दक्षिणमधील जनतेच्या मनातील खासदार आमदार नीलेश लंके किंवा राणी लंके हेच आहेत, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया संबंधितांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. यामुळे ही निवडणूक आपण लढवावी, असा आग्रह उपस्थितांनी आमदार लंके यांच्यासमोर धरला. परंतु याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणे किंवा भाष्य करणे टाळले.

पवार कुटुंबीय माझ्यासाठी प्रमाण : लंके

माझ्या राजकारणातील मर्यादा या घालून ठेवल्या आहेत. साहेब, दादा आणि ताईंचा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे. त्यापलीकडे जायचे नाही, ही माझ्या भविष्यातील राजकारणाची भूमिका असणार आहे. त्यांनी मला आदेश दिला, तर कोणी कितीही मोठा असला, तरी आपण त्याच्या विरोधात लढण्यास तयार आहोत, अशाच शब्दात आमदार नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे एक प्रकारे अप्रत्यक्ष संकेत देऊन चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला.

Back to top button