उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सततच्या चोरीच्या घटनांमुळे अखेर क्यूआर कोड कार्यान्वित

अंजली राऊत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
अमृतधाम – हिरावाडी लिंकरोड परिसरातील शिवकृपानगरमध्ये सलग दोन दिवस घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे पंचवटी पोलिस अलर्ट झाले असून, शहर काँग्रेस व्हीजेएनटी विभागाने केलेल्या मागणीनुसार घरफोडी व चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी परिसरात 'क्यूआर कोड' कार्यान्वित करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व परिसरातील महिलांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

शिवकृपानगरमध्ये सोमवारी (दि. 21) गॅस सिलिंडरची चोरी व मंगळवारी (दि. 22) पहाटे दुचाकीची चोरी अशा सलग दोन दिवस चोरीच्या घटना घडल्या. यासंदर्भात नाशिक शहर काँग्रेस व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष शरद बोडके यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देऊन पंचवटी पोलिसांना घडलेल्या घटनांची माहिती दिली. तसेच, परिसरातील घरफोडी व चोरीचे प्रकार रोखण्यासाठी परिसरात क्यूआर कोड लावण्याची मागणी बोडके यांनी केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. कोल्हे यांनी तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार संतोष घुगे व कुमावत यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. नागरिकांच्या मागणीनुसार शिवकृपानगरमधील मारुती मंदिर येथे महिलांच्या हस्ते क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोडके यांनी परिसरातील समस्यांची माहिती देतानाच नागरिकांना राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सीताराम कोल्हे यांच्या कार्याचीही माहिती दिली. लवकरच परिसरात सीसीटीव्ही लावण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी सोनाली बोडके यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील कलाबाई देशमुख, जिजाबाई वाबळे, कमल गिते, छाया सोनवणे, शीला कदम, कल्पना कापडणीस, प्रतीभा सोनवणे, राधा बिडवे, सुनंदा पाटील, शोभा चासकर, वैशाली लासुरे, स्वाती सोनवणे, गौरी सूर्यवंशी, अ‍ॅड. शीतल पाटील, संतोष पाटील, जनतेश यादव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यायला हवी. घरामध्ये गरजेपुरतेच पैसे ठेवावेत, जास्तीत जास्त पैसे बँकेत ठेवण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेर पडताना शेजारील नागरिकांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. महिलांनी दागिने वापरताना सुरक्षा बाळगावी. त्याचबरोबर अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने पालकांनी लक्ष देण्याचे गरजेचे आहे. – डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT