उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहरातील खड्ड्यांप्रश्नी मनपाविरोधात आपची निदर्शने

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात संततधार आणि मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांबाबत आम आदमी पार्टीतर्फे महापालिकेसमोर गुरुवारी (दि.२२) निदर्शने करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत तयार करण्यात आलेल्या परंतु, सध्या खड्डे पडलेल्या रस्त्यांचे ऑडिट करून दोषी ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीद्वारे केली.

आप शिष्टमंडळातर्फे अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच अंध-अपंग व्यक्तींना रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत असल्याचे आपच्या निवेदनात म्हटले आहे. नाशिककर जनता या खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त झाली आहे. मनपामार्फत काही रस्ते दुरुस्त करण्यात आले. परंतु, तेदेखील पावसामुळे पुन्हा खराब झाल्याने यातून नागरिकांची सुटका झालेली नाही. ही सर्व स्थिती केवळ निकृष्ट कामांमुळेच झाल्याचा आरोप आपने केला आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या रस्ते डांबरीकरणाच्या कामांचे ऑडिट करून संबंधित दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात येऊन रस्त्यांच्या त्रासातून नागरिकांची त्वरित सुटका करावी. येत्या सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा आम आदमी पक्षातर्फे देण्यात आला आहे. आंदोलनात आपचे जितेंद्र भावे, जगबीरसिंग, राजेंद्र गायधनी, समाधान अहिरे, नविंदर अहलुवालिया, प्रतीक पवार, संदीप बनसोडे, सतीश सांगळे, स्नेहा भालेराव, सतीश अस्वरे, शालिनी वाघ, अ‍ॅड. पुष्पा ढवळे, विनायक येवले, संजय कातकाडे, कलविंदर सिंग, अ‍ॅड. नीलम बोबडे, बाळासाहेब बोडके, कस्तुरी आटवणे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT