उत्तर महाराष्ट्र

नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस; द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर

गणेश सोनवणे

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

टोमॅटो, सोयाबीन, कांदा पिकाला चांगला दर नसल्याने शेतकरीवर्गाच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात नुकसानीमुळे आलेले अश्रू सुकत असताना आता घसरलेल्या दरांमुळे पुन्हा अश्रू आले आहेत. तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम आ वासून उभ्या राहिल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे चारी मुंड्या चित झाला आहे.

सध्या तर टोमॅटोला क्रेटला ७० ते १०० भाव मिळत असल्यामुळे खर्च केलेले भांडवल वसूल होण्याची आशा मावळली आहे. ७० ते १०० क्रेटला भाव मिळत असून, त्यात २० रुपये गाडीभाडे, खुडण्याची २० रुपये प्रतिक्रेट मजुरी यामुळे सध्या टोमॅटो उत्पादकाच्या हातात अवघे २० ते ३० रुपये पडत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना भांडवल कसे उपलब्ध करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यात चालू वर्षी पावसाने विक्रमी नोंद केली आहे. त्यामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने निसर्गापुढे बळीराजाने अक्षरशः हात टेकले होते. त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाव नसल्यामुळे साठवून ठेवलेला ७० टक्के कांदा चाळीत सडला. शिल्लक ३० टक्के कांद्याला शेवटपर्यंत भाव मिळालाच नाही. एक हजाराच्या आतच भाव मिळाल्याने फटका बसला. परिणामी खर्च केलेले भांडवल वसूल झालेले नाही. सध्या १५०० ते २००० रुपये क्विंटल इतका भाव मिळत असून, आता कांदा उत्पादकांकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे पुढील कांदा लागवडीला भांडवलाची समस्या निर्माण झाली आहे. लागवड खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, निंदणी, मजुरी यावरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट ऐकायला मिळत आहे ती म्हणजे "कांद्याने केला वांधा".

पाण्यात सडला सोयाबीन

चालू वर्षी तालुक्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसून उत्पादनात घट झाली आहे. अतिपावसामुळे झाडाची फक्त वाढच झाली, पण शेंगा मात्र खूप कमी प्रमाणात होत्या. त्यात शेवटच्या टप्प्यात काढणीला आलेल्या सोयबीन पिकाला पाण्याचा मोठा फटका बसून सोयबीन खराब झाला. कुठे सोयबीनवर काळी बुरशी तयार झाली, तर कुठे सोयाबीनचे काढणीला आलेले पीक पाण्यात सडले. चालू वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाने धोका दिल्यामुळे बळीराजाच्या पदरी निराशा आली आहे.

द्राक्षशेती धोक्याच्या उंबरठ्यावर

सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्ष उत्पादकांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे उत्पादक हतबल झाला आहे. प्रत्येक हंगामात या ना त्या कारणाने द्राक्ष उत्पादक तोट्यात जाताना दिसत आहे. त्यात प्रामुख्याने प्रत्येक वर्षी हवामान बदलाचा फार मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. प्रत्येक वर्षी अतिवृष्टी, ढगफुटी, बेमोसमी पाऊस, वादळ अशा संकटामध्ये द्राक्षबागायतदार वर्ग सापडला आहे. अनेक शेतकरी या संकटामुळे कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त होत चालला आहे. द्राक्षशेतीचा मागील १० ते १२ वर्षांचा सूक्ष्म अभ्यास केल्यास अतिशय धोक्याच्या उंबरठ्यावर द्राक्षशेती उभी राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील दोन हंमागांत तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोरोनाच्या विषाणूमुळे दिवाळे निघाले आहे. अनेकांनी आपला माल शेतात खुडून टाकल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने कुठलीही मदत मात्र जाहीर केली नाही. अनेक वेळा गारपीट, बेमोसमी वादळाने झालेल्या नुकसानीचे फक्त पंचनामे झाले मात्र अजूनही प्रतीक्षाच आहे.

रब्बीसाठी कोण देवदूत

सध्या रब्बी हंगाम तोंडावर आल्याने भांडवल कसे उभे करायचे या विवंचनेत शेतकरी आहे. कारण अगोदरच असलेले कर्ज फिटलेले नाही. सध्याच्या हंगामासाठी बळीराजाच्या मदतीला कोण देवदूत धावून येणार याकडे शेतकरीवर्गाच्या नजरा लागलेल्या आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT