

अकोले; पुढारी वृत्तसेवा : अकोले शहरात पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून दोन देशमुखांमध्येच तुंबळ मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यातील एका देशमुखाने दुसर्या देशमुखाच्या डोक्यात पाण्याचा स्टीलचा जग मारल्याने संबंधित देशमुख रक्तबंबाळ झाला अन त्याच्या डोक्याला टाके पडले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अकोले शहरातील अगस्ती विद्यालयासमोर असलेल्या हॉटेल दिपज्योती जवळ ही घटना शनिवार (दि.12) रोजी सकाळी 11 वाजता घडली. हॉटेल दिपज्योतीमध्ये प्रशांत संपतराव देशमुख हे चहा पिण्यासाठी आले होते. त्याचवेळी नरेंद्र मधुकर देशमुख हे ही त्या ठिकाणी आले. यावेळी सुरुवातीला दोघांमध्ये शांततेत चर्चा सुरू होती.
मात्र त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.यावेळी प्रशांत देशमुख यांनी नरेंद्र देशमुख यांच्या डोक्यात पाण्याचा जग मारल्याने ते गंभीर जखमी झाले.अशाही परिस्थितीत त्यांनी प्रशांत देशमुख यांना जमिनीवर यथेच्छ लोळवले.मात्र डोक्यातून अति रक्तस्राव होत असल्याने त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेतला.
दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.डोक्यात स्टीलच्या जगाचा जोरदार प्रहार झाल्यामुळे नरेंद्र देशमुख यांच्या डोक्याला टाके पडले आहे.त्यातच त्यांचा रक्तदाब प्रमाणापेक्षा वाढल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. भांडकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नरेंद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरून प्रशांत संपतराव देशमुख (रा. सुगाव बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रशांत देशमुख यांनीही अकोले पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र मधुकर देशमुख (रा. रुंभोडी) यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.