नाशिक, पिंपळगाव बसवंत www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पिंपळगाव बसवंतचा पुरातन वटवृक्ष ‘गुगल मॅप’वर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळविणार्‍या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने या वर्षाच्या स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. यावर्षी ग्रामपंचायत हद्दीतील पुरातन वृक्षगणना पूर्ण केली आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे या वृक्षांची नोंद ही 'गुगल मॅप'वर करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने हेरिटेज ट्री (पुरातन वृक्ष) गणना पूर्ण केली आहे. गावठाणात 16,500 वृक्ष असून, त्यापैकी 479 वृक्ष हे पुरातन वृक्ष आढळले आहेत. यात सगळ्यात जुना 220 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष आढळला आहे. उर्वरित झाडांचे आयुर्मान 100 ते 150 वर्षे आहे. ही वृक्षगणना पूर्ण करून गुगल मॅप्सवर प्रकाशित करण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीने वृक्षांचे छायाचित्रासह नाव आणि माहिती गुगल मॅप्सवर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या फेसबुक पेजवर हेरिटेज वृक्षांच्या नोंदीची दखल घेण्यात आली असून, पर्यावरण विभागाच्या सचिव डॉ. मनीषा म्हैसेकर यांनी याबद्दल फेसबुकवर कौतुक केले आहे. याबाबत ग्रामसेवक लिंगराज जंगम यांनी सांगितले की, सर्व वृक्षांची गणना होऊन ती माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर गुगल मॅपवर गावातील सर्व वृक्ष नागरिकांना बघता येणार आहे. तसेच या झाडांची वर्गवारी करण्याचेही काम सुरू आहे.

पिंपळगाव बसवंतमधील सर्व वृक्षांची गणना करून त्यातील 479 वृक्षांना पुरातन दर्जा देण्यात आला आहे. या वृक्षांची तोड करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच या वृक्षांच्या संवर्धनासाठी ग्रामपंचायतीकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. -अलका बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT