उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जिल्हा परिषदेत आता एकच जलसंधारण कार्यालय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या पश्चिम व पूर्व या दोन विभागांचे एकत्रीकरण करून एकच जलसंधारण अधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा निर्णय मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे. यामुळे सध्या नाशिक जिल्हा परिषदेतील जलसंधारण अधिकारी ही दोन पदे रद्द होऊन एकच अधिकारी संपूर्ण जिल्ह्याचे कामकाज बघणार आहेत. हे रद्द झालेले कार्यालय रायगड येथे कार्यान्वित होणार आहे.

मृद व जलसंधारण विभागाचे राज्यभर 26 जलसंधारण अधिकारी व 127 उपविभागीय अधिकारी कार्यालये कार्यान्वित आहेत. तसेच जिल्हा परिषदांमध्ये 31 जलसंधारण अधिकारी व 168 उपविभागीय कार्यालये आहेत. मृद व जलसंधारण विभागाने राज्यस्तरावरील काही पदे व कार्यालयांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात समन्वय साधण्यासाठी जिल्हा परिषदांमधील काही पदे व कार्यालयांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली व भंडारा ही पाच नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये व पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेतील पूर्व व पश्चिम ही दोन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयांचे एकत्रीकरण करून तेथे एकच जिल्हा जलसंधारण अधिकारी हे पद निर्माण केले जाणार आहे. ते कमी केलेले कार्यालय व पद आता रायगड येथे कार्यान्वित होणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेतील पंधरा तालुक्यांमधील 15 उपविभागीय अधिकारी कार्यालयांची संख्याही कमी करून त्याऐवजी दोन तालुके मिळून एक याप्रमाणे सात उपविभागीय कार्यालये कार्यान्वित असतील. तसेच या ठिकाणच्या कार्यालयांची संख्या कमी झाल्यामुळे तेथील अभिलेखे व कर्मचारी यांचे समायोजन लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT