उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या विशेष फेरीची आज गुणवत्ता यादी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांत इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत तीन नियमित व एक विशेष फेरी पडली असून, अद्यापही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने दुसऱ्या विशेष फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. १५) प्रसिद्ध होणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसांत अर्थात शनिवार (दि. १७)पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६३ कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावीच्या २६ हजार ४८० जागांसाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत चार प्रवेश फेऱ्यांमध्ये १६ हजार ६८० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पहिल्या नियमित फेरीत ९ हजार ४६२, दुसऱ्या नियमित फेरीत १ हजार ४३८, तिसऱ्या नियमित फेरीत १ हजार ३४५ व पहिल्या विशेष फेरीत ३ हजार ५९५ जागांवर विद्यार्थ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. तर अद्यापही ९ हजार ८०० जागा रिक्त आहेत. तिन्ही नियमित फेऱ्यांमध्येही कट ऑफ घसरला होता. विशेष फेरीत कट ऑफ वाढल्याचे चित्र बघावयास मिळाले. अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने दुसरी विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयाची ऑनलाइन पसंती क्रमांक नोंदविण्याची संधी दिली हाेती. या कालावधीतच कनिष्ठ महाविद्यालयांनी ३ कोट्यांतील रिक्त जागा कॅपकडे प्रत्यार्पित केल्या. या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत निवड प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. तर १८ सप्टेंबरला कनिष्ठ महाविद्यालयातील कोटानिहाय रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहे.

प्रवेशाची सद्यस्थिती अशी…

महाविद्यालये : ६३

प्रवेश क्षमता : २६,४८०

अर्ज निश्चिती : २५,३५१

प्रवेश निश्चिती : १६,६८०

रिक्त जागा : ९,८००

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT