लेवे खून खटला : डी. व्ही. दादांच्या कारकिर्दीतील माईलस्टोन | पुढारी

लेवे खून खटला : डी. व्ही. दादांच्या कारकिर्दीतील माईलस्टोन

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारचे सुपुत्र आणि कायदा क्षेत्रात देशभर किर्ती मिळवणारे अ‍ॅड. धैर्यशील पाटील उर्फ डी. व्ही. दादा यांच्या निधनानंतर त्यांनी लढवलेल्या खटल्यांना उजाळा दिला जात आहे. महत्वपूर्ण खटल्यांपैकी सातार्‍यात घडलेल्या शरद लेवे खून खटला हा डी.व्ही. दादांच्या कारकिर्दीतील माईलस्टोन आहे.

1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघे काही तास राहिले असतानाच नगरसेवक शरद लेवे यांचा खून होवून त्याप्रकरणात उदयनराजे भोसले यांना अटक झाली होती. उदयनराजे यांच्या अटकेसाठी मतदानादिवशीच पोलिस मुख्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याने हे प्रकरण संपूर्ण प्रकरण देशभर गाजले होते. दि. 11 सप्टेेंबर 1999 साली सातारा नगरपालिकेचे नगरसेवक शरद लेवे यांचा बोगदा येथे निर्घृण खून करण्यात आला होता. त्यावेळी अभयसिंहराजे भोसले यांच्या विरुध्द त्यांचे पुतणे उदयनराजे भोसले यांच्यामध्ये विधानसभेची काटे की टक्कर अशी लढत लागली होती. निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. दोन्ही बाजूने उभा संघर्ष पेटला होता. त्यातच विधानसभेच्या मतदानाला अवघे चार तास शिल्लक राहिले असताना पहाटे खुनाची घटना समोर आल्यानंतर सातारा शहरासह राज्यात खळबळ उडाली.

या खूनप्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 15 जणांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. यामुळे घटनेपासून ते पुढे दोन वर्षे निकाल लागेपर्यंत सातार्‍यात अघोषीत तणाव परिस्थिती होती. या महत्वपूर्ण खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम तर उदयनराजे यांचे वकील अ‍ॅड. डी. व्ही. पाटील होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान अनेकदा अ‍ॅड. निकम व डी. व्ही. दादा यांच्यात युक्तीवादादरम्यान शाब्दिक खडाजंगीही झाली होती. दोघेही नावाजलेले वकील असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे युक्तीवादादरम्यान कोणतीही कसूर राहणार नाही याची काळजी दोन्ही बाजूने घेतली गेली होती. त्यामुळेच खटल्याची सुनावणी जसजशी पुढे पुढे जात होती तसतशी निकालाची उत्सुकता ताणली जात होती. निकाल कसाही लागला तरी सातार्‍यातील तणाव वाढणार होता त्यामुळे पोलिसांचीही परीक्षाच होती.

डी. व्ही. दादांनी वकिली व्यवसायात देशभरात आपला दबदबा निर्माण केल्याने सातार्‍यातील शरद लेवे खून खटल्यातून ते उदयनराजेंना अलगद सोडवतील, असा विश्वास जनतेला वाटत होता. त्याचवेळी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचेही कर्तृत्व सर्वदूर असल्याने खटल्याचा निकाल सरकारच्या बाजूने लागण्याची भीतीही जनतेमध्ये होती.

न्यायालयात युक्तीवाद सुरु असताना सुरुवातीपासून अ‍ॅड. डी. व्ही. पाटील यांनी न्यायालयात विविध दाखले, सायटेशन, पुरावे, व्हिडीओ, अ‍ॅडिओ पुराव्यांची जंत्रीच सादर करुन राजकीय द्वेषापोटी उदयनराजे भोसले यांना या खून खटल्यात गोवल्याची बाजू मांडली.

खुना अगोदर व प्रामुख्याने खुनानंतर सरकार पक्षाकडून कसे चुकीचे साक्षीदार उभे केले जात आहेत, सरकार पक्षाच्या प्रत्येक पुराव्याची लिंक कशी राजकीय व खोटी आहे हे त्यांनी मुद्देसुद मांडले होते. न्यायालयीन कामकाजादरम्यान लेवे खून खटल्याच्यानिमित्ताने प्रथमच व्हिडीओचा पुरावा म्हणून वापर झाला. या व्हिडीओच्या माध्यमातूनच अ‍ॅड. डी. व्ही. पाटील यांनी बरेच मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याशिवाय इतरही दाखले दिले होतेच. या खटल्यातील डी.व्हीं.च्या युक्तीवादाची कायदा क्षेत्रातील भल्याभल्यांनी प्रशंसा केली होती. उदयनराजे भोसले यांच्यावतीने अ‍ॅड. डी. व्ही. पाटील, सहकारी वकील अ‍ॅड. शिवदे, अ‍ॅड. जगताप यांनी किल्ला लढवला असताना दुसरीकडे त्याच ताकदीचे व तोलामोलाचे सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनीही कायद्याचा किस पाडला होता. यामुळे या खून खटल्यावेळी प्रत्येक सुनावणीवेळी राज्याचे लक्ष राहिले होते.

अखेर दि. 29 जून 2001 साली सातारा जिल्हा न्यायालयात शरद लेवे खून खटल्याच्या निकालाची तारीख निश्चित करण्यात आली. सकाळपासून सातारा अघोषित बंद होता. सातारा जिल्हा पोलिसांसह इतर जिल्ह्यातूनही पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. चौका-चौकात, रस्त्या-रस्त्यावर पोलिस तैनात होते. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा न्यायालयात निकाल ऐकण्यासाठी सातारकरांनी तोबा गर्दी केली होती. न्यायालयातील कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अखेर न्यायाधिश एस. जी. कुलकर्णी यांनी श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह सर्व संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळेच शरद लेवे खून खटला अ‍ॅड. डी. व्ही. दादांसाठी त्यांच्या कारकिर्दीतील माईलस्टोन मानला जातो.

Back to top button