उत्तर महाराष्ट्र

नाशिक : माध्यमकर्मींसमोर सामाजिक बांधिलकी जपण्याचे आव्हान : राहुल सोलापूरकर

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
माध्यमांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असून, ते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. राष्ट्रहितार्थ मूल्यांची रुजवणूक हीच या समाजमाध्यमांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत माध्यमांनी सजगपणे वार्तांकनास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विश्व संवाद केंद्र आणि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधत डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय माध्यम संवाद परिषद झाली. 'माध्यमाचा गैरवापर आणि माध्यमांची ताकद' या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, कार्यवाह नितीन देशपांडे, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे उपस्थित होते.

सोलापूरकर यांनी 'सद्यस्थितीतील माध्यमांवर सुरू असलेले वार्तांकन व बदलणारी माध्यमे' या विषयांवर वेगवेगळी उदाहरणे देत संवाद साधला. चित्रपटांनी, वृत्तपत्रांनी अर्थकारण, मनोरंजन यांना अवास्तव महत्त्व देऊन राष्ट्रीय विचारांपासून, वास्तवापासून माध्यमांना दूर नेले आहे. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करताना सर्व समाजमाध्यमांनी स्वत:चे पुनरुज्जीवन करण्याची गरज असल्याचे सोलापूरकर म्हणाले.

कुलकर्णी यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगितले. परिषदेच्या समारोपात पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर विचार मांडले. नरवणे, देशपांडे यांनी राहुल सोलापूकर, अभय कुलकर्णी, नितीन देशपांडे यांचा डॉ. मुंजे यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे खंड, रामाची मूर्ती व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया देवघरे, मंदार ओलतीकर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी स्वातंत्र्य आंदोलनातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, 'स्वातंत्र्यलढा आणि संस्थाने', 'स्वातंत्र्यलढा चर्च आणि मिशनरी', 'भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान', 'स्वराज्य 75' इत्यादी 17 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT