नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक बाजारपेठेत आज कोथिंबीर 120 रुपये जुडीने विकली गेली. नवरात्रोत्सवात कोथिंबिरीचे भाव 200 रुपये जुडीच्या आसपास गेल्यानंतर दिवाळीच्या आधी भाव कमी होऊन 30 ते 40 रुपये जुडी झाली होती. मात्र, आता कोथिंबिरीची जुडी 120 रुपये झाली असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, कोथिंबीरसोबतच इतर पालेभाज्या महागल्याचे चित्र बाजारपेठेत बघावयास मिळाले. यात प्रामुख्याने मेथी, पालक, शेपू यांच्यासारख्या पालेभाज्यांचे दर गगनाला जाऊन भिडले आहेत. ऐन दिवाळीच्या हंगामात मुंबई, पुणे, सुरत येथून भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात भाववाढ झाल्यानंतर बाहेरगावीदेखील मोठ्या प्रमाणात दरवाढ होत असते. यंदाचा पावसाळा आणि परतीचा पाऊस दोन्ही मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतमालाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजी मालाची आवक मंदावली आहे. परिणामी, ही भाववाढ अचानक वाढली आहे. शहराच्या आजूबाजूच्या मळे परिसरात पावसाची रिपरिप थांबून नवीन भाजीपाला बाजारात येण्यास साधारणपणे एक ते दीड महिना अवकाश आहे. त्यामुळे ही आवक सुरळीत होण्यासही तितकाच वेळ लागण्याची आवश्यकता आहे. तोपर्यंत भाव वाढलेलेच बघायला मिळणार आहेत.