उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वैर कारभार समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळा बायोमेट्रिक सक्तीचे केल्याने गुरुवारी (दि.२५) अधिकाऱ्यांसह कर्मचारी 'फुलटाइम ऑन ड्यूटी' दिसून आले. एरवी बैठका तसेच व्हिजिटच्या नावे दिवसभर दांडी मारणारे कर्मचारी तसेच अधिकारी बायोमेट्रिक सक्तीमुळे आपापल्या कार्यालयातच आढळून आले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच, अधिकारी तसेच कर्मचारी स्वैर पद्धतीने कारभार हाकत असल्याचे दिसून आले होते. प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुख्यालयात अचानक एण्ट्री करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्वैर कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यानंतर त्यांनी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून ई-मुव्हमेंटसह दिवसातून तीन वेळा बायोमेट्रिकची सक्ती केली. गुरुवारपासून (दि.२५) बायोमेट्रिकची अंमलबजावणी करण्यात आल्याने, अधिकाऱ्यांनी आपापल्या दालनातून बाहेर पडणे टाळले. बायोमेट्रिकसह सीसीटीव्ही देखील तपासले जात असल्याने अधिकाऱ्यांनी 'इन टाइम आणि आउट टाइम'लाच सीसीटीव्हीत झळकणे गरजेचे समजले.

अधिकारी कार्यालयात असल्याने, कर्मचारीदेखील दिवसभर कामांवर लक्ष केंद्रित करून असल्याचे दिसून आले. दरम्यान, कर्मचाऱ्यांबरोबर अधिकारीदेखील दांड्या मारत असल्याने, त्यांचे एक दिवसांचे वेतन कमी करण्याची शिक्षा प्रभारी आयुक्तांनी ठोठावल्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रभारी आयुक्तांच्या या निर्णयांचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे काहींनी बायोमेट्रिक सक्तीचे स्वागत केले, तर काहींनी मात्र या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

इनर्व्हटरमध्ये बिघाड, कर्मचारी घामाघूम

गुरुवारी सायंकाळी ५ च्यादरम्यान वीज गेल्याने, मुख्यालयातील वातानुकूलन यंत्रणेसह पंखे बंद पडले होते. एरवी वीज गेल्यानंतर इनर्व्हटरवर ही सर्व यंत्रणा सुरू असते. मात्र, इनर्व्हटरमध्ये बिघाड झाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना दालनात बसणे अवघड झाले होते. अखेर सर्व कर्मचारी, अधिकारी व्हरांड्यात जमले. इनर्व्हटर यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर पुन्हा अधिकारी-कर्मचारी आपापल्या दालनात परतले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT