चीन समुद्रात बुडालेल्या जहाजांवरील शेकडो भांडी | पुढारी

चीन समुद्रात बुडालेल्या जहाजांवरील शेकडो भांडी

बीजिंग : चीन समुद्रात पाचशे वर्षांपूर्वी बुडालेल्या दोन जहाजांचे अवशेष सापडले आहेत. याठिकाणी दोन जहाजांचे लाकूड तसेच चिनी मातीची शेकडो भांडी आढळून आली आहेत. त्यांचा संबंध मिंग काळाशी असू शकतो. जुन्या काळातील व्यापारावर या शोधामुळे नवा प्रकाश पडू शकतो.

चिनी संशोधकांनी म्हटले आहे की समुद्रात सापडलेल्या या पाचशे वर्षांपूर्वीच्या वस्तू ‘ओल्ड सिल्क रूट’ (जुना रेशीम मार्ग) आणि व्यापार मार्गांविषयीची माहिती देणार्‍या आहेत. दक्षिण चीन समुद्राच्या वायव्य किनार्‍याजवळ 1.6 किलोमीटर खोलीवर हे अवशेष सापडले आहेत. तिथे ज्या भांड्यांचे अवशेष सापडले आहेत त्यांची आयात-निर्यात मिंग काळातील जुन्या रेशीम मार्गावरून केली जात होती. संशोधकांचे म्हणणे आहे की जहाजांचे हे अवशेष मिंग राजवंशाच्या होंगीजी काळाशी संबंधित आहेत. हा काळ सन 1488 ते सन 1505 पर्यंतचा आहे. याठिकाणी चिनी मातीची अनेक भांडी व लाकडे आढळली आहेत. आता या ठिकाणी अधिक संशोधन केले जात आहे.

Back to top button