नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात इंदिरानगरसारख्या भरवस्तीत बिबट्याची कातडी आढळून आली होती. सहा दिवसांनंतरही कातडीचे अवशेष परीक्षणासाठी हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. अवशेष पाठविण्यास विलंब होत असल्यामागे मार्चएण्डच्या कामांचा व्याप असल्याचा अजब दावा वनाधिकार्यांनी वर्तविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक वनवृत्तात वन्यजीवांच्या तस्करीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नाशिकमधून कासव, पोपट, विदेशी प्राणी, मृत सागरी जीव आणि गिधाडांच्या तस्करीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. फेब—ुवारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत चार कातडी नाशिक जिल्ह्यातून जप्त झाल्या आहेत. शहापूर व कोल्हापूर वनविभागाने छापेमारी करत काही संशयितांना ताब्यात घेतले होते. विशेषत: शहापूर वनविभागाच्या तपासात नाशिकमध्ये स्लिपर सेल कार्यान्वित झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे वन्यजीव तस्करीचे नाशिक केंद्रबिंदू ठरत असल्याचे स्पष्ट होऊनही पश्चिम विभाग मात्र सुस्त आहे.
दरम्यान, नाशिक-मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटा परिसरात सापडलेल्या बिबट्याच्या कातडीचे अवशेष हैदराबादमधील प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय वनपथकाने घेतला होता. परीक्षणाअंती संशोधनात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला वेग येणार आहे. मात्र, ही कातडी पाठविण्यासाठी प्रयोगशाळेतूनही सूचना मिळालेल्या नाहीत. असा दावा वनाधिकार्यांनी केला आहे. त्यामुळे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक आणि पश्चिम विभागात या तिन्ही कार्यालयांना तस्करीच्या गुन्ह्याबाबत गांभीर्य नसल्याची चर्चा रंगत आहे.