नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या आरटीए समितीने सिटी लिंक खासगी बससेवेला मनपा हद्दीपासून २० किमी अंतरापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल पाच हजार रिक्षा व टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली असून, सिटिलिंक बससेवा शहर हद्दिपुरतीच मर्यादित ठेवावी, अशी मागणी श्रमिक सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील एक वर्षापासून नाशिक महापालिकेने ठेकेदार पध्दतीने सिटी लिंक ही खासगी बससेवा सुरू केलेली आहे. सुरुवातीला शहर हद्दीत सुरू असलेल्या या बससेवेचा विस्तार ग्रामीण भागापर्यंत वाढला. कोरोना काळ व एसटी कामगारांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत होती. म्हणून आरटीए समितीच्या अध्यक्षांनी या खासगी बस चालकांना मनपा हद्दीपासून २० किमी अंतरापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली. परंतु, आता कोरोना काळ संपलेला असून, एसटी कर्मचा-यांचाही संप मिटलेला आहे. कोरोना काळातील सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील खासगी बस ग्रामीण भागात प्रवाशांची वाहतूक करत असल्याने एसटी महामंडळाचे नुकसान होऊन पर्यायाने शासनाचेही नुकसान होत आहे.
तसेच काळी पिवळी टॅक्सी, रिक्षा सेवा कोरोना काळात बंद होती. कित्येक रिक्षा व टॅक्सींवर विविध बँका तसेच फायनान्स कंपन्यांचे कर्ज आहेत. तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण, कुटूंबाचा उदरनिर्वाह व वृद्ध आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च हे सर्व टॅक्सी चालकांना त्यांच्या रोजच्या कमाईतूनच भागवायचे असते. मागील १७ ते १८ माहिने गाड्या जागेवर उभ्या असल्याने त्यांचा मेंटेनन्स होऊ शकलेला नाही. तो ही खर्च वेगळा आहे. पण खासगी बससेवेमुळे टॅक्सी चालकांच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले असून, सुमारे पाच हजारांहून अधिक रिक्षा व टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खासगी बस सेवा शहर हद्दीपुरतीच मर्यादित ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष अजय बागूल, जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक, जिल्हा सरचिटणीस नवाज सय्यद, महानगरप्रमुख मामा राजवाडे, उपजिल्हाध्यक्ष शंकर बागूल, उपजिल्हासंघटक राजेंद्र वाघले आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नियमाप्रमाणे टॅक्स भरूनही जर रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवसाय करता येत नसेल तर टॅक्स भरून त्यांचा काय उपयोग? मनपाने आता ग्रामीण भागातील बससेवा बंद करून केवळ शहरातच सेवा बजवावी. जेणेकरून रिक्षा-टॅक्सी चालकांची चूल पेटेल आणि त्यांची उपासमार थांबेल. मनपाने ग्रामीण भागातील बससेवा बंद न केल्यास सर्व रिक्षा-टॅक्सी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उभ्या करून निषेध व्यक्त केला जाईल.
– सुनील बागूल, संस्थापक, श्रमिक सेना, नाशिक