उत्तर महाराष्ट्र

नाशिक : कळवाडीच्या ‘त्या’ रेशन दुकानाची आठवडाभरात चौकशी होणार

गणेश सोनवणे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
भर उन्हात दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या सेल्समन महिलेली प्रकृती खालावताच प्रशासकीय यंत्रणा हलली. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी आठ दिवसांत कळवाडीतील 'त्या' दुकानाबाबत तहसीलदारांनी केलेल्या कार्यवाहीची आठ दिवसांत चौकशी करून त्या आधारे कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्या कुटुंबाने तिसर्‍या दिवशी आंदोलन स्थगित केले.

मालेगाव : कळवाडीतील स्वस्त धान्य दुकानप्रकरणाच्या चौकशीचे आश्वासनपत्र देताना प्रांताधिकारी विजयानंद शर्मा.

शेतकरी सहकारी संघाचे कळवाडी गावात स्वस्त धान्य दुकान आहे. त्याचे सेल्समन म्हणून कल्पना वाघ यांची दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी नियुक्ती झाली. मात्र, त्यानुसार दुकान चालविण्यास देण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने दि. 11 जानेवारी 2022 पर्यंत विलंब केला. या दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली गेली. जानेवारीत दुकान जोडणी आदेश देताना फक्त 20 टक्केच धान्य उचल करू दिले गेले. मात्र, धान्य वाटपासाठी आवश्यक ई-पॉज मशीन दिले नाही. ते फेब्रुवारी महिन्यात दिले. परंतु, कार्यान्वित केले नाही. ते सुरू झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी दुकानाचाच परवाना रद्द करीत धान्य वितरणापासून रोखण्यात आले. राजकीय दबावातून महसूल विभागाने हा अन्याय केल्याचा आरोप करीत वाघ कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी मंगळवार (दि.22) पासून तहसीलजवळ उपोषण सुरू केले होते.

दरम्यान, प्रशासनाने या वादाच्या सुनावणीत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी स्टे दिलेला असल्याने दुकानाचा परवाना अद्याप कायम असल्याने धान्य वाटपास अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीवर आंदोलक कायम राहिले. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी केलेली शिष्टाईदेखील निष्फळ ठरली. त्यानंतर प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. बुधवारी (दि. 23) सायंकाळी तहसीलच्या कर्मचार्‍यांनी आंदोलनस्थळी तहसीलदारांचे पत्र टाकले. हे दुकान शेतकरी सहकारी संघाचे असून, ते चालविण्यास दि. 11 मार्च 2022 पासून आदेश पारित आहेत. तरी, संघ आणि वाघ यांच्यात झालेल्या कराराशी तहसील कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याने उपोषण मागे घ्यावे, असे फर्मावण्यात आले. याच वेळी उपोषणकर्त्या वाघ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

यानंतर यंत्रणेने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. प्रांतांनी गुरुवारी (दि. 24) पुन्हा आंदोलकांची भेट घेतली. या चर्चेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शेतकी संघाच्या स्वस्त धान्य दुकानाबाबत तहसीलदारांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची आठ दिवसांत चौकशी करून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिले. त्यावर समाधान झाल्याने वाघ कुटुंबाने उपोषण सोडले.
या आंदोलनाला भाजपचे पदाधिकारी संदीप पाटील, छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष जीवन सोनवणे यांनी पाठिंबा दिला होता.

न्यायापर्यंत लढा…
जिल्हा पुरवठा अधिकारी हे त्यांच्यामार्फत आठ दिवसांत या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्यानुसार नियमबाह्यरीत्या नाहक छळवणूक करणार्‍या दोषींवर कारवाई न झाल्यास अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात येईल, असे उपोषणकर्ते अ‍ॅड. सचिन वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT